विजापूर : रुग्णालयात दाखल जखमी दरोडेखोर.Pudhari File Photo
Published on
:
18 Jan 2025, 1:04 am
Updated on
:
18 Jan 2025, 1:04 am
विजापूर : गेल्या पाच, सहा दिवसांपासून शहरातील जनतेची झोप उडवणार्या दरोडेखोरांच्या टोळीवर पोलिसांनी गोळीबार केला. या घटनेत एक दरोडेखोर जखमी झाला तर तिघे पसार झाले. रात्रभर दरोडेखोरांवर पाळत ठेवून पोलिसांनी ही कारवाई केली.
विजापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून दरोडेखोरांची टोळी वेगवेगळ्या भागात दरोडा टाकून सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडल्या होत्या. विजापूर शहराजवळील टोलनाक्याजवळ पहाटे 3 वाजता पळून जाणार्या दरोडेखोरांवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या. यामध्ये जखमी झालेल्या संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.
शहरातील कनकदास वसाहतीत घरफोडी झाल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी दरोडेखोरांचा पाठलाग करून गोळीबार केला. यामध्ये मध्यप्रदेशचा रहिवासी महेशला गोळी लागून तो जखमी झाला. उर्वरित तिघे फरार असून त्यांच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. एका शेताजवळ दरोडेखोरांवर गोळीबार करण्यात आला. पहाटे त्या ठिकाणी शोध घेत असताना एक दरोडेखोर जखमी अवस्थेत आढळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गुरूवारी रात्री या टोळीने विजापूरच्या जैनापूर ले-आऊटमधील संतोष यांच्या घरात घुसून त्यांच्यावर चाकूने वार करून पत्नीचे सोन्याचे दागिने लुटून पळ काढला होता.
एका दरोडेखोरास अटक करण्यात आली असून इतरांना लवकरच अटक केली जाईल, असे जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले.