आ. मकरंद पाटीलFile Photo
Published on
:
25 Nov 2024, 12:35 am
Updated on
:
25 Nov 2024, 12:35 am
वाई : विधानसभा निवडणुकीत वाई मतदारसंघातून आ. मकरंद पाटील यांनी पुन्हा एकदा मोठया मताधिक्याने विजय मिळवत चौकार मारला आहे. मकरंदआबांचा जनमाणसातील प्रभाव यानिमित्ताने पुन्हा समोर आला. प्रतिकुल परिस्थितीतही त्यांनी अजितदादांची सोबत करण्याचा निर्णय घेतला होता. गतवेळी हुकलेली मंत्रीपदाची संधी दादा, आता तरी द्या, मकरंदआबांना मंत्री करा, अशी एकमुखी मागणी आता वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातील स्व. लक्ष्मणराव पाटील प्रेमींकडून होऊ लागली आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील समाधीचे दर्शन घेण्यासाठी सोमवार दि. 25 नोव्हेंबर रोजी येत आहेत. यानिमित्ताने वाई-महाबळेश्वर-खंडाळा मतदारसंघातील जनतेने अजितदादांना साकडे घातले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडासाफ केला आहे. सातारा जिल्ह्यातही महायुतीने 8-0 असा दणकेबाज विजय मिळवला. त्यामध्ये खा. नितीन पाटील व आ. मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांचाही वाटा आहे. वाई विधानसभा निवडणुकीत आ. मकरंद पाटील यांनी तब्बल 61 हजारांचे मताधिक्य घेत चौकार मारला.
मकरंदआबांची जनमाणसावर मोठी पकड आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी आबांचे घराणे एकनिष्ठ राहिले आहे. लक्ष्मणतात्यांनीही राष्ट्रवादीसाठी अनेक खस्ता खालल्या आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुरुवातीच्या कालावधीनंतर मकरंदआबांनी अजितदादांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. अजितदादांनी मकरंदआबांना मंत्रीपदाची ऑफर दिली असतानाही त्यांनी मतदारसंघातील शेतकर्यांचा विचार करून मंत्रिपद नाकारून किसनवीर आणि खंडाळा कारखान्याला थकहमी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. त्यानुसार अजितदादांच्या माध्यमातून दोन्ही कारखान्यांना 467 कोटींचे कर्ज मिळाले आहे. त्यामुळे दोन्ही कारखान्यांच्या कर्जाचा डोंगर कमी होऊन समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
मकरंदआबा सलग चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेले असून त्यांच्या कामगिरीची दखल घ्यावी. महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 10 मंत्रीपदे येत आहेत. त्यामधून मकरंदआबांना मंत्री करावे, असा सूर वाई मतदार संघातील स्व. लक्ष्मणतात्या प्रेमींकडून आळवला जात आहे. दरम्यान, सोमवारी मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजितदादांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी अजितदादांकडे मकरंदआबांच्या मंत्रीपदाची मागणी केली जाणार आहे. त्यावर अजितदादा काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागून राहिले आहे.