Published on
:
07 Feb 2025, 12:55 am
Updated on
:
07 Feb 2025, 12:55 am
सोलापूर ः दुचाकीला मॉडिफाय सायलन्सर लावून कर्कश आवाज काढणार्या व ध्वनी प्रदूषण करणार्या दुचाकींवर कारवाई केली आहे. तब्बल दोन हजार 582 दुचाकीस्वारांचे मॉडिफाइड सायलेन्सर काढून वाहतूक शाखेने कारवाई करीत त्यांचा आवाज बंद केला आहे.
सोलापूर वाहतूक शाखेच्या दक्षिण आणि उत्तर विभागांतर्गत ही कारवाई करण्यात आली. यामध्ये दुचाकीचे सायलेन्सर मॉडिफाय करून देणार्या चालकांवर कारवाई करीत त्यांना दंड ठोठावला. यात 503 जणांनी दंड भरला आहे. तर दोन हजार 79 जणांनी दंड भरण्याकडे पाठ फिरवली आहे.
दुचाकींचे सायलन्सर मॉडीफाई करणार्या गॅरेजवाले तसेच मॉडीफाईड सायलन्सर विक्रेते यांना देखील कारवाईबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. नागरिकांना अशा पद्धतीने दुचाकीस्वार कर्णकर्कश आवाज करत असल्याचे दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) सुधीर खिरडकर यांनी दिली.
‘त्या’ सायलन्सरवर बुलडोझर
बुलेटसह अन्य अत्याधुनिक मोटारसायकलचे ओरिजिनल सायलेन्सर काढून त्याऐवजी मॉडीफाइड कर्कश आवाज काढणारे सायलेन्सर लावतात, त्यामुळे इतर प्रवाशांना प्रचंड मानसिक त्रास होतो. या मॉडीफाइड सायलेन्सरने बेफाम झालेले तरुण रस्त्यावर धूमस्टाईल बाइक चालवून मस्ती करतात. काही दिवसांपासून असे प्रकार वाढतच असल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याअंतर्गत जप्त करण्यात आलेल्या सर्व मॉडीफाइड सायलन्सरवर बुलडोझर चालवण्यात आला आहे.
वाहनचालकांची मुजोरी वाढली
दुचाक्यांना चारचाकी वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न बसविण्यात येतात. महाविद्यालयीन तरुणाईच्या महागड्या दुचाक्यांना हे कर्णकर्कश हॉर्न असतात. त्याचप्रमाणे, शहराच्या ध्वनिप्रदूषणात आणखीच भर रिक्षांमधील साउंड सिस्टीममुळे पडते. वर्दळीच्या ठिकाणी रिक्षांमध्ये मोठ्या आवाजातील साउंड सिस्टीम बसविण्यात आलेल्या रिक्षा धावताहेत. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे या वाहनचालकांची मुजोरी वाढली आहे.
एकूण केसेस ः 2,582
एकूण पेड केसेेस ः 503
एकूण अनपेड केसेस ः 2079
एकूण कालावधी ः 12 महिने