Published on
:
04 Feb 2025, 11:38 pm
Updated on
:
04 Feb 2025, 11:38 pm
लोणंद : राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत फक्त चर्चा केल्या जात आहे. यावर चर्चा तर किती करायची, किती वेळ घालवायचा? भविष्यात दोन्ही गट एकत्र येणार का माहीत नाही. पवार साहेबांनी दिशा दाखवली त्याप्रमाणे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त त्या दिशेने आम्ही जात आहोत. जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे सामान्य लोकांचा आवाज म्हणून लढत राहणार आहोत, अशी ग्वाही आ. रोहित पवार यांनी केली.
लोणंद येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, सध्या राज्यातील परिस्थिती फार बिकट आहे. दोन समाजांमध्ये वाद निर्माण करण्याचे काम सुरू आहे. रोजगार, शिक्षण, शेतकर्यांवर चर्चा होत नाही, निर्णय होत नाहीत. शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे पण यावर निर्णय होत नाही. 2000 रुपये खात्यामध्ये टाकून दुसरीकडे शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान केले जात आहे.
बीडच्या देशमुख कुटुंबावर झालेल्या अन्यायाबाबत आरोप झाल्यानंतर नैतिकता दाखवून राजीनामा देण्याची गरज आहे, परंतु तसे होत नाही. आर आर पाटील, अजित पवार, विलासराव देशमुख यांनी नैतिकता दाखवत राजीनामे दिले होते. असा दाखलाही त्यांनी दिला. ईव्हीएम मशीन बाबत शंका दूर झाली नाही तर लोकांचा लोकशाहीवर विश्वास उडेल. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची गरज निर्माण झाली. राज्यात दररोज बलात्कार, मर्डर होत आहेत . शेतकर्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे .राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, असेही आ. पवार म्हणाले.