धक्कादायक! पोलीस उपनिरीक्षकाने उचललं टोकाचं पाऊलPudhari
Published on
:
08 Feb 2025, 5:26 am
Updated on
:
08 Feb 2025, 5:26 am
लोणावळा: पुणे आयुक्तालयातील खडकी येथील पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळा टायगर पॉइंटजवळील शिवलिंग पॉइंट येथे एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 7) उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना शिवलिंग पॉइंटजवळ एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहिले असता, आत्महत्या केलेल्या ठिकाणाजवळ एक गाडी उभी होती. त्या गाडीची माहिती घेतली असता गाडीमालकाचे नाव अण्णा गुंजाळ (रा. खंडगाव, संगमनेर, अहिल्यानगर) असल्याचे समजले.
त्या गावच्या पोलीस पाटलाशी संपर्क केल्यानंतर ही गाडी अण्णा गुंजाळ यांचीच असून, ते खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे समजले. पोलिसांनी खडकी पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता, गुंजाळ हे तिथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत व ते तीन दिवसांपासून गैरहजर होते आणि त्यांचा फोनही लागत नव्हता. त्यांची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली जाणार होती, असे पोलिसांना समजले. यातून मयताची ओळख पटली आहे.