Published on
:
28 Nov 2024, 12:45 am
Updated on
:
28 Nov 2024, 12:45 am
नारळाच्या झाडाला आपल्याकडे ‘कल्पवृक्ष’ म्हटले जाते. ओल्या नारळाला ‘शहाळे’ असे म्हणतात. याचे पाणी शक्तिवर्धक, थंड व खनिजसंपन्न असते. आरोग्यासाठी या पाण्याचे खूप फायदे होतात. त्यातील जीवाणूविरोधी गुण शरीराची प्रतिकारक्षमता वाढवण्यास मदत करतात.
शहाळ्याचे पाणी प्यायल्यास रक्ताभिसरण सुधारते. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि इतर कार्डियोव्हॅस्क्युलर आजार होण्याचा धोका कमी होतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासही त्याचा उपयोग होतो. वजन कमी करायचे असेल तरीही नाऱळाचे पाणी उपयुक्त असते. नियमित शहाळ्याचे पाणी प्यायल्यास प्रतिकार क्षमता वाढते. पोषक घटक आणि जीवनसत्त्वे जसे रिबोफोल्विन, नियासिन, थियामिन, पेंटोथेनिक अॅसिड, कोलाईन आणि फोलेटसमुळे यात जीवाणूविरोधी गुण असतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. यातील खनिजे, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअममुळे व्यक्तींना मूत्राशयाच्या आजारात फायदा होतो. शहाळ्याच्या पाण्यामुळे मूत्रवृद्धी होते. त्यामुळे मूत्रप्रवाह आणि मूत्रप्रवृत्ती वाढते. डॉक्टर महिलांना गर्भावस्थेत शहाळ्याचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. कारण त्यामुळे बद्धकोष्ठता, जळजळ, पचनतंत्रात बिघाड दूर होण्यास मदत होते.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, जुलाब किंवा उल्टी-जुलाब असा त्रास होत असल्यास नारळपाणी प्यावे. नारळपाण्यात इलेक्ट्रोलाईट पोटॅशिअम हँगोव्हर उतरण्यासही मदत करते. नारळाच्या पाण्याचे आरोग्यासाठी असणारे फायदे अनेक असले तरी कोणत्याही शस्त्रक्रियेनंतर पहिले दोन आठवडे नारळाचे पाणी पिऊ नये. कारण शस्त्रक्रिये दरम्यान आणि नंतर रक्तदाब नियंत्रित होण्यामध्ये समस्या निर्माण होतात. व्यायाम केल्यानंतर नारळाच्या पाण्याऐवजी साधे पाणी प्यावे. नारळाच्या पाण्याचे अतिसेवन केल्यास जास्त मूत्रप्रवृत्ती होते. ज्यांची प्रकृती कफाची आहे किंवा थंड प्रकृती असलेल्या लोकांनी शहाळ्याचे पाणी सेवन करू नये.