करमाळा : करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीला अटीतटीची वाढणारी वाटणारी निवडणूक शेवटपर्यंत रंगतदार अवस्थेत गेली. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजितदादा समर्थक विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर 16 हजार 85 मतांनी दणदणीत विजय मिळवला.
दोन लाख 31 हजार 353 मतदारांनी केलेल्या मतदानामधून 96 हजार 91 मते नारायण पाटील यांना मिळाली. आमदार संजय मामा शिंदे यांना 80 हजार 6 मते, तर महायुती शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार दिग्विजय बागल यांना 40 हजार 834 मते मिळाली. दुसरे अपक्ष उमेदवार प्रा. रामदास झोळ यांना अवघे 4 हजार 791 मतापर्यंतच मजल मारता आली. नारायण पाटील यांना निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांनी आमदार झाल्याचे पत्र बहाल केले. यावेळी माजी आ. जयवंतराव जगताप, सावंत गटाचे नेते सुनील सावंत, अॅड. राहुल सावंत, राजू अण्णा पाटील, अतुल पाटील, देवानंद बागल, गहिनीनाथ ननवरे, बंडू माने, ज्ञानेश्वर पवार, सुनील तळेकर, प्रा. अर्जुन सरक, मुबारक फकीर, नवनाथ झोळ, सूर्यकांत पाटील, भास्कर भांगे आदी उपस्थित होते.
आमदार संजयमामा शिंदे यांना 36 गावांमधून अवघी 19 हजार 419 मतांची आघाडी घेतली. ही तोकडी आघाडी संजयमामा शिंदे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. त्यातच कुर्डूवाडीसह छत्तीस गावांमध्ये 67 टक्के मतदान झाले होते, त्याचाही फटका संजयमामा शिंदे यांना बसला. त्याच प्रमाणात टपाली मतांमध्येही 1976 पैकी 985 मते नारायण पाटील यांनी घेतली, तर संजयमामा शिंदे यांनी 640 मते, तर दिग्विजय बागल यांनी 243 मते घेतली. संजयमामा शिंदे यांना छत्तीस गावांमधून हवे तेवढे मतदान घेता आले नाही. छत्तीस गावांमधून संजयमामा शिंदे यांनी आघाडी घेतली असली तरी त्यांना आवश्यक तेवढे मतदान न मिळाल्याने पराभव झाला