मी काय केले, यापेक्षा तुमच्या नातवाला पाच वर्षांमध्ये काय केले याचा हिशेब विचारा, असे आव्हान आमदार राम शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिले. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचाराची सांगता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते सोमवारी झाली. त्या वेळी शिंदे बोलत होते.
जे. पी. नड्डा यांचे हेलिकॉप्टर यायला उशीर झाल्याने आणि तोपर्यंत सभेची वेळ संपल्याने त्यांना भाषण करता आले नाही. मात्र त्यांचे जोरदार टाळ्या वाजवून नागरिकांनी स्वागत केले. यानंतर त्यांनी जनसमुदायाला अभिवादन केले.
दरम्यान, या वेळी झालेल्या जाहीर सभेला मधुकर राळेभात, अंबादास पिसाळ, कैलास शेवाळे, प्रवीण घुले, अशोक खेडकर, सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, विनोद दळवी, दादासाहेब सोनमाळी, श्री गायवळ सर, काकासाहेब धांडे, अनिल गदादे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी झालेल्या सभेमध्ये आमदार राम शिंदे यांनी शरद पवार व आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार आणि प्रखर टीका केली. राम शिंदे यांचे भाषण अतिशय त्वेषाने झाले. रोहित पवार यांना हिशोब विचारा असे आवाहन शरद पवार यांना करतानाच, ते म्हणाले, की मी पाच वर्षे मंत्री होतो; मात्र मतदारसंघांमध्ये सर्वांगीण विकास केला. यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची निविदा माझ्याच काळात निघाली. सर्व तालुक्यातील धार्मिक क्षेत्रांना मी निधी दिला. सर्वांत महत्त्वाच्या तुकाई चारीला मंजुरी दिली; मात्र रोहित पवार यांनी ही योजना बंद पाडली. माळढोक अभयारण्याची बंदी उठवली.
रोहित पवार यांनी नगरपंचायत निवडणुकीमध्ये दमदाटी व दबाव आणला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी कर्जत व जामखेडमध्ये समसमान अशा नऊ जागा मिळवल्या, तर अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत.
कुकडीसाठी पाच टीएमसी पाणी अतिरिक्त मंजूर झाले आहेत. मात्र हे सर्व त्यांना काही कळणार नाही अशी उपरोधक टीका रोहित पवार यांच्यावर राम शिंदे यांनी केली. यावेळी अनेकांची भाषणे झाली.