Published on
:
18 Nov 2024, 12:00 am
Updated on
:
18 Nov 2024, 12:00 am
सध्याची बाजार घसरण ही मुख्यत्वे शेअर बाजारात जी मोठी वाढ झाल्याने शेअर्स मूल्यांकन प्रचंड वाढले त्यातून झालेली असल्याने याला आवश्यक व आरोग्यदायी घसरण किंवा अपेक्षित घसरण मानली जाते. एकूण जागतिक विकास दर व त्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेचे सक्षम व विकासकेंद्रित धोरण बाजार नव्या उच्चांकाकडे नेण्याच्या शक्यता दर्शवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
भारतीय शेअर बाजारातून विदेशी संस्था गुंतवणूकदार (Foreign Institutional Investers F II) सातत्याने विक्रीचा मारा करीत राहिल्याने सेन्सेक्स व निफ्टी किंवा एकूण बाजार 10 टक्क्यांनी अथवा 8000 पेक्षा अधिक अंकाने घसरला आहे. ही घसरण भारतीय भांडवल बाजारातून सुमारे 170000 कोटींची गुंतवणूक काढून घेतल्याने झाली असून आणखी किती प्रमाणात घसरण होईल ही सर्वसाधारण गुंतवणूकदाराची भयमानसिकता आहे. सध्या काही गुंतवणूकदार बाजारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याची व आपले नुकसान करून घेण्याची शक्यता आहे. यासाठी प्रथम बाजार घसरण समजून घेणे जसे महत्त्वाचे आहे तसेच आगामी कालखंडात भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे बदल व त्यातून निर्माण होणार्या संधी लक्षात घेतल्यास गुंतवणूक निर्णय अधिक सुयोग्यपणे करणे शक्य होईल.
शेअर बाजार हा सातत्याने चढ-उतारालाच असतो व त्यामध्ये 35 टक्के पर्यंत घसरण अनुभवलेली आहे. कोव्हिडचा कालखंड किंवा त्यापूर्वी 2008 चे जागतिक वित्त संकट, नोटाबंदी अशा विविध टप्प्यांत बाजार घसरलेला होता. अशा प्रकारच्या सर्व धक्क्यांना पचवीत एकूण नक्त परतावा फायद्यातच दिला आहे. सध्याची घसरण ही विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीने दिसत असली, तरी याबाबतची आकडेवारी थोडे वेगळे चित्र दर्शवते. एकूण शेअर्स मालकीत असणारा वाटा विदेशी गुंतवणूकदारांचा 2008 मध्ये 14.7 टक्के होता. तो 2013 मध्ये 21 टक्के इतका सर्वोत्तम होता. 2023 मध्ये 19 टक्के असणारा वाटा आता 17 टक्क्यांपर्यंत घसरला असून हा प्रवाह (निफ्टी) 2023 पासूनचा आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. देशांतर्गत वित्तसंस्था गुंतवणूकदार (Domestic Institutional Invester) सातत्याने करीत असलेल्या खरेदीने त्यांचा वाटा 21 टक्क्यांवरून 26 टक्के असा वाढला आहे. यांनीदेखील विक्रीत सहभाग घेतला, तर बाजारात आणखी 10 टक्के घसरण झाली असती. सध्याची घसरण ही मुख्यत्वे शेअर बाजारात मोठी वाढ झाल्याने शेअर्स मूल्यांकन प्रचंड वाढले, त्यातून झालेली असल्याने याला आवश्यक व आरोग्यदायी घसरण किंवा अपेक्षित घसरण मानली जाते. एकूण जागतिक विकास दर व त्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेचे सक्षम व विकास केंद्रित धोरण बाजार नव्या उच्चांकाकडे नेण्याच्या शक्यता दर्शवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
सकारात्मक व विकासपूरक क्षमता
जागतिक स्तरावर गुंतवणुकीच्या बदलत्या संधीचा फायदा घेण्याच्या भूमिकेतून गुंतवणूक प्रवाह ठरतात. सध्या जपानच्या विकासाचा दर 0.345 वरून आगामी वर्षासाठी 1.1 टक्के म्हणजे चारपटीने वाढण्याच्या अंदाजाने गुंतवणूक प्रवाह तिकडे वळल्याचे दिसते. अमेरिकेचा विकास दर 2.8 टक्क्यांवरून 2.2 टक्के, तर चीनचा 4.8 टक्क्यांवरून 4.5 टक्के, तर भारताचा 7 टक्क्यांवरून 6.5 टक्के असा आहे. सर्व देशांच्या विकास दरात भारताचा विकास दर थोडा घसरला असला, तरी तो सर्वाधिक आहे हे महत्त्वाचे आहे. ही विकासक्षमता व शक्यता गुंतवणूक प्रवाह युवा भारताकडे येण्यास कारक ठरू शकते. भारताची अर्थव्यवस्था आकाराने विस्तारत असताना त्यासाठी अनेक पूरक घटक मदतकारक असून त्यातूनच भारताचे विकास स्वप्न नाकारले जाणार आहे.
सरकारचे गुंतवणूक प्रेरक धोरण विशेषतः उत्पादन निगडीत प्रेरक (PLI) योजना इलेक्ट्रॉनिक उत्पादनात आपली निर्यात वाढवणेस हातभार लावीत असून निर्यातीमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा 2011 मध्ये 1.5 टक्के होता तो आता 2023 मध्ये 5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. वाढती निर्यात, विदेशी चलनाचा साठा केवळ समाधानकारक नव्हे, तर अभिमानास्पद पातळीवर 628 बिलियन डॉलर्स म्हणजे सर्वाधिक विदेशी चलनसाठा असणार्या देशात सहाव्या क्रमांकावर आहे. गुंतवणुकीत पायाभूत सुविधांना रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक, बंदरे असा सर्वच क्षेत्रांत एका बाजूला प्राधान्य देत 10 लाख कोटींची प्रतिवर्ष गुंतवणूक व दुसर्या बाजूला महसुली खर्च कमी केल्याने राजकोशीय तूट मर्यादित करण्याचे उद्दिष्टही साध्य केले आहे. वित्तीय शिस्त हा महत्त्वाचा निकष विदेशी गुंतवणूकदार वापरतात, हे भारताच्या पथ्यावरच पडते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणात्मक बदलाचे पडसाद भारतीय बाजारावर नकारात्मक पडतील, ही भीती अनाठायी अथवा चुकीची असून गेल्या दहा वर्षांत भारताने अमेरिकेसोबत केलेल्या व्यापारातून निर्यात 52 बिलियन डॉलर्सपर्यंत वाढवली आहे. ट्रम्प आयात व्यापारावर मोठे कर आकारणी करतील, असा अंदाज व्यक्त होत असला, तरी तो प्रत्यक्षात येणे अवघड आहे. कारण, यातून अमेरिकेत पुन्हा भावाढ होण्याचा धोका उद्भवतो. जागतिक स्तरावरतील युद्धे, तेल किमती व त्यातून निर्माण होणारी आव्हाने भारत सक्षमपणे पेलत असल्याचा व विकास गती कायम ठेवण्याचा आपला इतिहास भविष्यकालीन बाजारदिशा सकारात्मक असल्याचे स्पष्टपणे दर्शवतो.
सध्या अनेक चांगल्या कंपन्यांचे शेअर्स वाजवी किमतीला उपलब्ध होत असून ही गुंतवणूक संधी धाडसाने घेणारे उत्तम परतावा घेऊ शकतील. मोठी व तरुण लोकसंख्या, वाढते उत्पन्न, आवश्यक वित्तपुरवठा, राजकीय स्थैर्य व विकासपोषक धोरणे या सर्व बाबी भारतीय शेअर्स बाजार चांगल्या परताव्याची हमी निर्माण करतो. छोटे, मध्यम गुंतवणूकदार सावधपणे योग्य शेअर्स अथवा म्युच्युअल फंड निवडून आपली गुंतवणूक रचना फायद्याची करू शकतात. व्याजासह योग्य वेळचे धाडस चांगला परतावा देऊ शकते व त्यासाठी हीच वेळ योग्य आहे.