आ. शिवेंद्रराजे भोसले, अमित कदमPudhari File Photo
Published on
:
30 Nov 2024, 12:35 am
Updated on
:
30 Nov 2024, 12:35 am
खेड : सातारा - जावली विधानसभा मतदारसंघात येणार्या सातारा शहरासह अवघ्या तालुक्यातही दोन्ही राजेंच्या मनोमिलनाचाच फॅक्टर चालला असून सबकुछ बाबाराजे असे चित्र गावागावांतील मतदानातून दिसून आले. सातारा शहरासह तालुक्यात शिवेंद्रराजेंनी तब्बल 1 लाख 1 हजार 604 चे मताधिक्य घेतले असून त्यामध्ये शहरातून 47 हजार 12 तर तालुक्यातील चार जि.प. गटातून 54 हजार 592 मतांची जोरदार आघाडी मिळवली आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे यांचा सातारा शहरासह तालुक्यातील करिष्माही यानिमित्ताने पुन्हा एकदा सिध्द झाला. विक्रमी विजयाने आ. शिवेंद्रराजेंसाठी मंत्रीपदाच्या पायघड्या घातल्या गेल्या.
सातारा शहर व तालुक्यावर फक्त अन् फक्त दोन्ही राजेंच्याच मनोमीलनाचा पगडा असल्याचे विधानसभा निवडणुकीच्या निकालाने पुन्हा दाखवून दिले. तसे या ठिकाणी दोन्ही राजे सोडून कुणाचे काही चालणारच नव्हते. मात्र, मतदानातून त्यावर आणखी मोहर उमटली. आ. शिवेंद्रराजे यांच्या वैयक्तिक प्रभाव व विकासकामांबरोबरच खा. उदयनराजे यांनी आपल्या भावाच्या विजयासाठी पायाला भिंगरी लावून घेतलेली मेहनतही अखेर कामी आली.
सातारा- जावली विधानसभा मतदारसंघात येणार्या सातारा तालुक्यात जिल्हा परिषदेचे कोंडवे, लिंब, पाडळी, कारी हे गट येतात. या गटात मतदारांनी सर्व अंदाज फोल ठरवत आ. शिवेंद्रराजे यांच्यावर सुमारे 62 हजार 106 मतांचा वर्षाव केला आहे. तर या गटात महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अमित कदम यांना अवघी 7 हजार 514 मते मिळाली आहेत. आ. शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा शहरासह तालुक्यातून सुमारे 1 लाख 24 हजार 575 तर अमित कदम यांना 23 हजार 131 मते मिळाली आहेत.
सातारा तालुक्यातील परंतू कोरेगाव विधानसभा मतदारसंघात असलेल्या खेड, देगाव, पाटखळ, कोडोली या जिल्हा परिषदेच्या गटातून तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अपशिंगे, नागठाणे गटातूनही महायुतीला भरभरुन मतदार झाले आहे. हे मतदान आ. शिवेंद्रराजे व खा. उदयनराजे यांच्या मनोमीलनाच्या जादूमुळेच झाले असून ते आ.महेश शिंदे व आ. मनोजदादा घोरपडे यांच्या पथ्यावर पडले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. निवडणूक कोणतीही असो शिवेंद्रराजे भोसले हाच आमचा पक्ष असे समजून सर्वजण त्यांना मते देतात. त्या बदल्यात गावागावात विकासकामे आणि थेट संपर्क त्यांनी कायम ठेवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या विरोधात कोणीही असले तरी विजय आ. शिवेंद्रराजे यांचाच होणार होता. या निवडणुकीत महायुतीकडून भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव जाहीर झाले. त्यामुळे त्यांना प्रचाराला चांगला वेळ मिळाला.
तसेच लोकसभा निवडणुकीत त्यांनी उदयनराजेंना सातारा तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देत विजयाचे शिलेदार ठरले होते. त्यासोबतच त्यांनी विधानसभेची साखर पेरणीही लोकसभेच्या निवडणूक प्रचारात करून ठेवली होती. त्यामुळे लोकसभेतील मदतीची भरपाई विधानसभेच्या निवडणुकीत करण्यासाठी खा.उदयनराजे व त्यांचे सर्व कार्यकर्ते आ. शिवेंद्रराजेंच्या विक्रमी मताधिक्यासाठी झटले. दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम केले आणि तेथेच मनोमीलनाची घट्ट मोट बांधली गेली. आ. शिवेंद्रराजेंनी सातारा तालुक्यात मिळविलेले मताधिक्य व भाजपचा बालेकिल्ला म्हणून दिलेली नवी उर्जा यामुळे सातारा राज्याच्या राजकारणाचे केंद्र ठरला आहे.
या मतदारसंघातील दोन्ही राजेंच्या मनोमीलनामुळे आ. शिवेंद्रराजे भोसले यांचा प्रभाव व आत्मविश्वास वाढला असून अस्तित्व नसलेल्या महाविकास आघाडीला हा निकाल चपराक देणारा ठरला आहे. विधानसभा निवडणुकीतील निकालामुळे जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार असून दोन्ही राजेंचा करिष्मा तसेच आ. शिवेंद्रराजेंना मिळालेले राज्यातील सर्वाधिक 1 लाख 42 हजार 124 चे मताधिक्य आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा मनोमीलनाचाच बोलबाला राहणार हे दाखवून देणारा आहे.