कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील कार्यालयासमोर विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.Pudhari Photo
Published on
:
23 Nov 2024, 11:58 pm
Updated on
:
23 Nov 2024, 11:58 pm
सोलापूर : भगव्या रंगाची मुक्तहस्ते होणारी उधळण, पक्षाचा ध्वज हातात घेत जय श्रीरामचा दिला जाणारा जयघोष, भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा’ या गाण्यावर मनसोक्त नृत्य करीत भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 23) शहर जिल्ह्यातील कार्यालयासमोर विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. या आनंदोत्सवात तरुण, ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, विधानसभेचे निकाल शनिवारी सकाळपासून येण्यास सुरुवात झाली. यात शहर जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच उमेदवारांनी आघाडी घेतली. शहर उत्तर, शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर येथील उमेदवार आघाडी घेताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर गुलाल उधळत, फटाके फोडत, एकमेकांना शुभेच्छा देत शहराच्या वेगवेगळ्या भागांतील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी तेथे जमू लागले. थोड्याच वेळात तेथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. एकमेकांना लाडू भरवून व अंगावर भगवा गुलाल लावत कार्यकर्त्यांनी ‘एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकीन है, जय श्रीराम अशा घोषणा देत जल्लोष साजरा केला.
‘जय श्रीराम’, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असो’ प्रभू रामचंद्र की जय’, बजरंग बली की जय’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी भाजपचे नवी पेठेतील कार्यालय तसेच सिव्हील चौक येथील कार्यालय येथे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेतेमंडळी एकत्र येत जल्लोष साजरा केला. महिलांनी फुगडी खेळत विजयाचा आनंद लुटला. शहरातील नागरिकांनीही सहभाग घेत ढोल-ताशा वाजवून आनंद व्यक्त केला. विशेषतः भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनीही या आनंदोत्सवात सहभाग घेतला. यावेळी भाजपच्या माजी नगरसेवकांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.