Published on
:
25 Nov 2024, 12:10 am
Updated on
:
25 Nov 2024, 12:10 am
रत्नागिरी : विधानसभेचा निकाल लागल्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीमधून पाचवेळा विजयी झालेले उदय सामंत हे आपले मोठे बंधू किरण सामंत यांच्यासह शनिवारी रात्री तातडीने मुंबईला रवाना झाले. राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात उदय सामंत यांना कोणती जबाबदारी मिळते, याकडे रत्नागिरीसह जिल्हावासीयांचे लक्ष लागले असतानाच त्यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे.
विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर राज्यासह जिल्ह्यातही महाविकास आघाडीचे पानीपत झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात महायुतीच्या चार जागा निवडून आल्या आहेत. यात रत्नागिरीमधून उद्योगमंत्री उदय सामंत, राजापूरमधून किरण सामंत, दापोलीतून योगेश कदम हे शिवसेनेमधून तर चिपळुणातील शेखर निकम हे राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षातून विजयी झाले. जिल्ह्यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. मविआचे भास्कर जाधव विजयी झाले असले तरी त्यांना निसटता विजय मिळाला आहे.
मागील मंत्रिमंडळाची मुदत मंगळवारी 26 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोमवार 25 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीच्या तीनही पक्षाच्या प्रमुखांनी आपल्या विजयी आमदारांना तातडीने मुंबईत बोलावून घेतले आहे.
रविवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयी आमदारांची बैठक घेतली. महायुतीमधील तीनही पक्षातील प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठका सुरु असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपद कुणाला यावर चर्चा झडत आहेत. नव्या मंत्रिमंडळात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाते, याकडेही जिल्हावासीयांसह कोकणाचे लक्ष लागले आहे.