मंगळवेढा : महाराष्ट्र विधानसभा प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या.Pudhari File Photo
Published on
:
16 Nov 2024, 11:33 pm
Updated on
:
16 Nov 2024, 11:33 pm
बंगळूर : कर्नाटकात हमी योजनांचे गाजर दाखवून काँग्रेसने फसवणूक केली आहे, अशी चुकीची जाहिरातबाजी करणार्या महायुतीवर खटला दाखल करण्याचा इशारा मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्यांनी दिला आहे.
पंढरपूरजवळील मंगळवेढा येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, कर्नाटक सरकारने राज्यात हमी योजनांची अंमलबजावणी न करून फसवणूक केल्याची खोटी जाहिरात देणार्या भाजपवर कर्नाटक सरकार गुन्हा दाखल करणार असून, त्यांना योग्य धडा शिकवू. पंतप्रधान आणि भाजपने कर्नाटकात येऊन बघावे. मी तुमच्यासाठी खास विमानाची व्यवस्था करीन. कर्नाटकात हमी योजनांची अंमलबजावणी झालेली नाही, असे आढळून आल्यास मी राजीनामा देईन. तुम्ही तुमची खोटी जाहिरात मागे घ्यावी आणि महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अन्यथा कर्नाटकात या आणि स्वतः बघा.
हमी योजनांद्वारे दरवर्षी 56 हजार कोटी कर्नाटक राज्यातील करोडो लोकांच्या खात्यात थेट जमा केले जातात. महाराष्ट्रातही काँग्रेस आणि महाविकास आघाडीने हमी योजना जाहीर केल्या आहेत. येथे महाआघाडी सरकार सत्तेवर येईल आणि सर्व आश्वासने पूर्ण करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मोदींकडे भ्रष्टाचाराविरुद्ध बोलण्याची नैतिकता नाही. तसे असेल तर माझे आव्हान स्वीकारा. ऑपरेशन कमळच्या माध्यमातून अनेक राज्यांतील आमदार खरेदीसाठी इतके कोटी रुपये आले कुठून, त्याचे महाराष्ट्रातील जनतेला उत्तर द्या, असेही सिद्धरामय्या म्हणाले. एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने सत्तेवर आले नाहीत. ऑपरेशन कमळच्या माध्यमातून ते सत्तेवर आले. या ऑपरेशनसाठी किती पैसे वापरले़? भ्रष्टाचार किती आहे? ते पैसे कुठून आले हे महाराष्ट्रातील जनतेला सांगता येईल का? कर्नाटकातील जनतेने भाजपचे ऑपरेशन कमळ नाकारले आहे. आता महाराष्ट्रातील जनतेची वेळ आहे. तुम्हीही ऑपरेशन कमळचे संस्कार नाकारून सत्तेवर या, असे त्यांनी सांगितले.
कर्नाटकमध्ये काँग्रेस उत्पादन शुल्क विभागाकडून 700 कोटींची लाच घेऊन महाराष्ट्रात निवडणुका लढवत आहे, असे उघडपणे खोटे सांगितले आहे. मोदीजी, तुमचे भाषण खरे ठरले तर मी त्याचक्षणी राजकारणातून संन्यास घेण्यास तयार आहे. अन्यथा, तुम्ही राजकीय निवृत्ती जाहीर कराल का, असे आव्हान सिद्धरामय्यांनी पंतप्रधान मोदींना दिले आहे.
मंगळवेढेजवळील महालिंगराय मतदारसंघात येणार्या भाविकांसाठी कर्नाटक सरकार यात्री निवास उभारेल, असे आश्वासन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. पंढरपूर हे विठ्ठलाचे संस्कार साजरे करणारे सर्वात पवित्र ठिकाण आहे. मंगळवेढा येथे शरण बसवेश्वर यांचे 14 वर्षे वास्तव्य होते. जातिभेद दूर करण्यासाठी बसवेश्वरांनी लिंगायत धर्माची स्थापना केली. अशा मतदारसंघात धर्माचे राजकारण करणार्या भाजपला पाडा, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, मंत्री एम. बी. पाटील, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव गोविंदराजू उपस्थित होते.