Published on
:
25 Nov 2024, 12:13 am
Updated on
:
25 Nov 2024, 12:13 am
मिरज तालुक्यातील म्हैसाळ व बेडग या दोन गावचे जावई व एक नातू, असे चारजण यंदा आमदार झाले आहेत. म्हैसाळचे जावई जयंत पाटील, सत्यजित देशमुख, बेडगचे जावई धनंजय मुंडे, तर बेडगचे नातू विनय कोरे असे चौघे विधानसभेत नेतृत्व करणार आहेत. यापैकी तिघे आधीपासूनच राज्याच्या राजकारणातील वजनदार नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. बेडगचे जावई व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र पराभव पत्करावा लागला आहे.
मिरज परिसराला मोठा ऐतिहासिक ठेवा आहे. मिरजेला जसा आरोग्य, सांस्कृतिक वारसा आहे, तसा राजकीय वारसाही आहे. मिरजेच्या पहिल्या आमदार होण्याचा मान हा महिलेला मिळाला होता. कळंत्रेआक्का या मिरजेच्या पहिल्या आमदार होत्या. 2024च्या विधानसभा निवडणुकीत मिरजेतून राज्याचे कामगारमंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे हे मिरजेतून चौथ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. एकाच पक्षाच्या एकाच कमळ या चिन्हावर सलग पाचवेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.
काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मिरज तालुक्यातील बेडग गावचे जावई आहेत. बेडगचे रामचंद्र ऊर्फ बापूसाहेब नरसिंहराव घोरपडे यांच्या कन्या सत्त्वशिला यांच्याशी पृथ्वीराज चव्हाण यांचा दि. 17 डिसेंबर 1976 रोजी मिरजेत विवाह झाला. पुढे पृथ्वीराज चव्हाण हे खासदार झाले. त्यानंतर ते केंद्रात मंत्री होते. त्यानंतर ते आमदार झाले. 9 नोव्हेंबर 2010 रोजी ते मुख्यमंत्री बनले होते. 2019 ला ते पुन्हा सातारा जिल्ह्यातील कराड मतदारसंघातून निवडून येऊन आमदार बनले होते. यंदा मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील हे मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावचे जावई आहेत. जयंत पाटील हे मिरजेचे माजी आमदार मोहनराव शिंदे यांचे जावई व मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे यांचे मेहुणे आहेत. जयंत पाटील यांचा विवाह मोहनराव शिंदे यांच्या कन्या शैलजा यांच्याशी झाला आहे. जयंत पाटील वाळवा मतदारसंघातून यंदा आठव्यांदा आमदार झाले आहेत. मनोज शिंदे यांचे दुसरे मेहुणे सत्यजित देशमुख हे शिराळा विधानसभा मतदारसंघातून प्रथमच निवडून आले आहेत. मनोज शिंदे यांची बहीण रेणुकादेवी यांचे सत्यजित देशमुख हे पती आहेत.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री विनय कोरे हेदेखील बेडग गावचे नातू आहेत. त्यांच्या आजी सावित्री कोरे या बेडगच्या होत. विनय कोरे हे 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार बनले. ते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा-शाहुवाडी मतदारसंघातून पाचव्यांदा आमदार बनले आहेत. राष्ट्रवादीचे आणखी एक पॉवरफुल्ल नेते म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते, ते बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे हेदेखील बेडग गावचे जावई आहेत. बेडग येथील महादेवराव ओमासे यांच्या कन्या राजश्री यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. धनंजय मुंडे हे विधानपरिषदेचे आमदार होते. आता ते परळी मतदारसंघातून विधानसभेत नेतृत्व करणार आहेत.