मुलीला लग्नाची मागणी घालणार्या कामगाराचा बेदम मारहाणीत मृत्यूfile photo
Published on
:
03 Feb 2025, 9:28 am
Updated on
:
03 Feb 2025, 9:28 am
पुणे: ‘तुमच्या मुली बरोबर लग्न करायचे आहे,’ अशी मागणी करणार्याचा चौघांनी केलेल्या मारहाणीत खून झाल्याचा प्रकार गोखलेनगर येथील शहीद तुकाराम ओंबाळे मैदानात घडली. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.
दिलीप यल्लपा अलकुंटे (वय 45) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. त्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी रामजी निलू राठोड (वय 50), अनुसया रामजी राठोड (वय 45), करण रामजी राठोड (वय 19) यांच्यासह यांच्या प्रथम खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ससून रुग्णालयात उपचार घेताना दिलीप अलकुंटे यांचा मृत्यू झाल्याने आरोपींविरोधात कलमवाढ करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आले असून, रामजी व अनुसया यांना अटक करण्यात आल्याचे चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयानंद पाटील यांनी सांगितले.
या प्रकरणी दिलीप अलकुंटे यांच्या वहिनी पुष्पा राजेश अलकुंटे यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही घटना शनिवारी (१ फेब्रुवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास गोखलेनगर येथील ओंबाळे मैदानावर घडली. दिलीप अलकुंटे यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. ते एका गॅरेजवर काम करत होते. तर आरोपी रामजी राठोड हे बिगारी कामगार म्हणून काम करतात.
दिलीप अलकुंटे यांनी रामजी राठोड यांच्याकडे त्यांच्या मुलीशी लग्न करायचे असल्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या वेळी आरोपींनी ‘तुझे वय काय’, ‘आमच्या मुलीचे वय काय’ असे म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. याला आता जिवंत गाडू, अशी धमकी देत आरोपी दिलीपला बेदम मारहाण करत होते. या मारहाणीत दिलीप गंभीर जखमी होऊन खाली कोसळला.
चतुःश्रृंगी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी असलेल्या दिलीपला ससून रुग्णालयात नेले, तसेच आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र, रविवारी सकाळी दिलीपचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर आरोपींविरोधात खुनाच्या गुन्ह्याचे कलम वाढविण्यात आले आहे. सहायक निरीक्षक दादाराजे पवार तपास करत आहेत.