राज्यात सीबीएसई पॅटर्न राबविणे आव्हानात्मकचFile Photo
Published on
:
06 Feb 2025, 5:59 am
Updated on
:
06 Feb 2025, 5:59 am
पुणे: येत्या दोन वर्षांत राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नुकतेच केले आहेत. परंतु, राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करणे आव्हानात्मक असून, गेल्या दोन वर्षांतील दहावीचा निकाल पाहिला, तर तब्बल पाच ते सहा लाख विद्यार्थी हे अंतर्गत तसेच अतिरिक्त गुणांमुळेच उत्तीर्ण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्न पेलवणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अहिल्यादेवी हायस्कूलचे माजी पर्यवेक्षक दीननाथ.द.गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सीबीएसई पॅटर्न राबविण्याचा विचार केला जात आहे. परंतु सीबीएसई पॅटर्न हा अत्यंत अवघड असतो. त्या पॅटर्नसमोर राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचा निभाव लागणे कठीण आहे.
कारण विविध शाळांच्या गेल्या दोन वर्षांतील मार्च 2023 आणि मार्च 2024 पास झालेल्या विद्यार्थ्यांचा आढावा घेतल्यानंतर असे लक्षात आले की तब्बल पाच ते सहा लाख विद्यार्थी हे केवळ शाळांनी दिलेले अतिरिक्त गुण तसेच अंतर्गत गुणांमुळेच उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे संबंधित पॅटर्न विद्यार्थ्यांना कसा पेलवणार, असा प्रश्नगोरे यांनी उपस्थित केला आहे.
गोरे यांनी उदाहरणादाखल एका विद्यार्थ्याची माहिती दिली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याला 51 टक्के गुण आहेत. भाषा विषयांत 50 टक्के गुण आहेत. परंतु विज्ञान व तंत्रज्ञानाच्या 80 गुणांच्या लेखी परीक्षेत फक्त 8 गुण आहेत. तर अंतर्गत परीक्षेत 20 पैकी 19 गुण मिळाले. त्यामुळे मूळ 8 तसेच अंतर्गतचे 19 असे 27 गुण झाल्यानंतर त्याला ग्रेस गुण 8 दिल्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान विषयांत 100 पैकी 35 गुण दाखविण्यात आले. विद्यार्थी तसेच पालकांना हे समजत नाही की संबंधित विद्यार्थ्याला केवळ 10 टक्के गुण लेखी परीक्षेत मिळाले आहेत.
60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण; गणित, विज्ञानात काठावर पास
60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान तंत्रज्ञान या दोन्ही विषयांच्या लेखी परीक्षेत तर काहींना गणितात किंवा विज्ञान तंत्रज्ञानात लेखी परीक्षेत 35 टक्के देखील गुण नसल्याचे आढळून आले आहे.