हार्बर मार्गावरील खार आणि सांताक्रुझदरम्यान रेल्वे ट्रॅकवर 15 फुटी लोखंडी तुकडा टाकणाऱयाला वांद्रे रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अब्दुल कादिर समत शेख असे त्याचे नाव आहे. नशेत असताना तो 15 फूट लोखंडी तुकडा घेऊन जात होता. लोखंडी तुकडय़ाचे वजन न पेलवल्याने त्याने तो तुकडा ट्रकवर टाकून तो निघून गेला अशी माहिती तपासात समोर आली आहे.
गेल्या काही महिन्यांत लोकलच्या ट्रॅकवर वस्तू घेऊन घातपाती कृत्य केल्याच्या घटनेची नोंद आहे. गेल्या गुरुवारी रात्री हार्बर मार्गावर अप लाइन मार्गावर गोरेगाव-चर्चगेट लोकल धावत होती. खार ते सांताक्रुझदरम्यान रेल्वे ट्रकवर लोखंडी तुकडा असल्याचे मोटरमनच्या लक्षात आले. मोटरमनने खाली उतरून तो लोखंडी तुकडा बाजूला काढला. त्यानंतर लोकल चर्चगेटच्या दिशेने रवाना झाली. याची माहिती स्टेशन मास्तरने रेल्वे सुरक्षा बल, वांद्रे रेल्वे पोलिसांना दिली. या घटनेनंतर स्टेशन मास्तर वांद्रे रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे मोरे आदी घटनास्थळी गेले. घटनास्थळी पोलिसांना दोन्ही पटरीच्या मध्ये 15 फुटांचा लोखंडी तुकडा दिसला. याप्रकरणी आरपीएफच्या उपनिरीक्षिका सपना शर्मा यांनी वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.
पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. तपासासाठी एक पथक तयार केले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये अब्दुल हा लोखंडी तुकडा घेऊन जात असल्याचे दिसले. त्यावरून तपासाची चव्रे फिरली. पोलिसांनी सापळा रचून अब्दुलच्या मुसक्या आवळल्या. कसून चौकशी केल्यावर त्याने तो तुकडा घेऊन जात असल्याचे सांगितले. त्या दिवशी अब्दुल हा नशेत होता. नशेत असताना त्याला त्या लोखंडी तुकडय़ाचे वजन पेलवले नाही. त्यामुळे त्याने तो तुकडा तेथेच टाकून तो निघून गेला. अब्दुलला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.