Published on
:
06 Feb 2025, 5:23 am
मुंबई : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हितासाठी कॅरी ऑन योजना लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यासाठी विद्यापीठाच्या पातळीवर एक समानता ठेवावी, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सर्व विद्यापीठांना दिल्या.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, काही वेळा शैक्षणिक कारणांमुळे किंवा अन्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी येतात. त्यांना पुन्हा संधी देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासातील अडथळे दूर करण्यासाठी कॅरीऑन योजनेचा उपयोग होतो, असे पाटील यांनी सांगितले. सर्व विद्यापीठांच्या पातळीवर एकसमानता असली पाहिजे. यासाठी कालबद्ध नियोजन करावे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी कॅरीऑन योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या वर्षासाठी पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात यावी, असेही पाटील म्हणाले.
सर्व आकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सर्व विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव (ऑनलाइन), उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर तसेच राज्यभरातील विविध अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अभियांत्रिकी विद्याशाखेतील प्रथम वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्राकरिता किंवा द्वितीय वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षाच्या सातव्या सत्राकरिता कॅरीऑन अंतर्गत विशेष संधी नसल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत नाही. गेल्या वर्षी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना विशेष संधी दिली होती. यंदा मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अंतिम वर्षात प्रवेश मिळत नाही ही भिती असून यामुळे विद्यार्थी प्रचंड मानसिक दडपणाखाली येत आहेत. एक वर्ष वाया जाईल या भितीमुळे अनेक विद्यार्थी विद्यापीठांकडे कॅरीऑनची मागणी केली आहे. यासाठी विद्यार्थी संघटनांना मागणी केली आहे.