आ. महेश शिंदेPudhari Photo
Published on
:
18 Nov 2024, 12:30 am
Updated on
:
18 Nov 2024, 12:30 am
कोरेगाव : जिहे-कठापूर योजनेतून कोरेगाव तालुक्याला दोन टीएमसी पाणी वाढवून देण्यात आले आहे. त्याद्वारे शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. 365 पैकी 300 दिवस कालवे सुरू ठेवण्याचा दिलेल्या शब्दावर ठाम आहे. धोमच्या पाण्याबाबत विरोधकांकडून चुकीचा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.
आ. महेश शिंदे म्हणाले, कोरेगाव तालुक्याचे सिंचनाचे क्षेत्र ठरलेले असून, धोम धरणातील पाण्याची आर्वतने ठरलेली आहेत. त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार राज्य सरकारलादेखील नाहीत, त्यामुळे पाणी कमी करण्याचा प्रश्नच येत नाही. धोमच्या पाण्याची आर्वतने कमी होणार म्हणणे साफ चुकीचे आहे. उलट कोरेगाव तालुक्याला दोन टीएमसी पाणी वाढवून देण्यात आले असून, ते डोंगराच्या पायथ्याने वितरीत केले जाणार असल्याने बारामाही ओढे-नाले आणि नद्या वाहत्या राहणार आहेत. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातील नेतेमंडळींना पोटशूळ उठला असून, त्यांच्या माध्यमातून विरोधक चुकीचा नरेटिव्ह पसरवत आहेत. काही भाडोत्री लोक आणून चुकीच्या पद्धतीने अपप्रचार केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
धोम डाव्या कालव्याचे अस्तरीकरणाचा विषय कोरेगाव मतदारसंघातच का काढला जात आहे? हा विषय आ. शशिकांत शिंदे का उचलून धरत आहेत? ते सातारा जिल्ह्यातील आहेत की बाहेरील जिल्ह्यातील आहेत. पुणे आणि सांगलीकरांची तळी ते का उचलत आहेत? त्यांच्या मनात नेमके काय पाप आहे. अस्तरीकरणासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून 50 कोटी रुपयांचा निधी का मंजूर करुन घेतला? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कालव्याचे अस्तरीकरण केल्यास पाणी जलदगतीने सांगली जिल्ह्याला जाईल. त्यासाठी जादा पाणी लागेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाण्याचे परक्युलेशन बंद होईल आणि शेतकर्यांना पाणी मिळणार नाही.
वास्तविक कोरेगाव तालुक्यातील 90 टक्के सिंचन हे धोम डाव्या कालव्याच्या पाण्याच्या परक्युलेशनवर चालले आहे. कालव्यालगत असलेल्या विहिरी या त्यावर अवलंबून असतात. ओढे-नाले आणि नद्या वाहिल्या तर शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटतो, हे माहीत असून देखील बाहेरील जिल्ह्यातील नेतेमंडळींच्या हातचे बाहुले झालेल्या विरोधकांनी जाणीवपूर्वक या विषयाचे भांडवल केले असल्याचा आरोप ना. महेश शिंदे यांनी केला. कोरेगावातील शेतकर्यांना त्यांना संपवायचे आहे का, असा सवाल करून ना. महेश शिंदे यांनी धोमच्या पाण्याबाबत सुरू असलेल्या अपप्रचाराला निष्क्रीय आमदारच कारणीभूत असल्याचा त्यांनी आरोप केला.
इतिहासात प्रथमच सर्वात जास्त पाणी
पुढील 40-50 वर्षांचे नियोजन करून पाण्याची उपलब्धता करून दिली आहे. इतिहासात प्रथमच सर्वात जास्त पाणी दिले आहे. वर्षातील 365 पैकी 300 दिवस कॅनॉल चालवणार... म्हणजे चालवणारच. त्यात बदल होणार नाही. हे पाणी सर्वसामान्य शेतकर्यांच्या मालकीचे असून त्यांनाच मिळणार आहे. त्याबद्दल मनात कोणतीही शंका नसावी. शेतकर्यांच्या हितासाठीच कार्यरत होतो, कार्यरत आहे आणि भविष्यातदेखील कार्यरत राहणार आहे, अशी ग्वाही ना. महेश शिंदे यांनी दिली.