Published on
:
03 Dec 2024, 9:19 am
Updated on
:
03 Dec 2024, 9:19 am
पुढारी ऑनलाइन डेस्क | महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेत गृहमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु आहे. त्यातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना आज (दि.३) ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे नव्या सरकारच्या शपथविधीला विलंब होत आहे.
अशातच आता नव्याने होऊ घातलेल्या सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार यावरून घमासन सुरु झाले आहे. याच चर्चेदरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे.
महायुतीत शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचा स्ट्राइक रेट अधिक असल्याने जेवढी मंत्रिपदे त्यांना मिळतील तेवढीच राष्ट्रवादीला देखील मिळाली पाहिजेत असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, अजित पवार यांच्या सोबत आमची बैठक झाली. त्या बैठकीत स्ट्राइक रेटबाबतचा विषय निघाला. राज्यात एक नंबर भाजप आहे तर दोन नंबरला आम्ही आहोत आणि तीन नंबरला शिंदेंची शिवसेना आहे. त्यामुळे स्ट्राइक रेट चांगला असून शिवसेनेइतकीच मंत्रीपदं आम्हाला मिळावीत. एकीकडे मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदावरचा तोडगा निघाला नसताना भुजबळांच्या या विधानाने आता महायुतीत आणखी फूट पडणार असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीत मंत्रिपदाच्या यादीत छगन भुजबळ यांच्याही नावाची चर्चा आहे, त्यावर विचारले असता, हे मी तुमच्याकडून ऐकतोय. मला देखील काही जणांनी नाव पाठवलेत पण हे सगळं अंदाज आहेत. आमचे नेते अजित दादा आहेत, ते स्वतः फोन करून सांगतील तेव्हा ते खरं असे भुजबळ म्हणाले.