संगमनेर तालुक्यात सर्रास अवैध वाळूचा उपासा सुरू असल्याचा प्रत्यय स्वतः आमदार अमोल खताळ यांना आला. जम-जम कॉलनीतील एका कार्यक्रमावरून घरी परतताना त्यांना रस्त्यात अवैध वाळू भरलेला पिकअप आढळला. दरम्यान, तत्काळ पिकअप वाहन थांबवून त्यांनी महसूल व शहर पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणी अजहर रमजान शहा (22, रा. कुरण रोड), विकास पोपट गिर्हे (20), गिरिष सुरेश बर्डे (24), राजु गणपत गिर्हे ( 19, रा. नान्नज दुमाला) व मोमीन पेंटर, नाव व गाव माहित नाही) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार खताळ यांना जम-जम कॉलनीत रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास अवैध वाळूने भरलेले पिकअप वाहन दिसले. चालकाला थांबवून, महसूलसह पोलिसांशी मोबाईलवरुन संपर्क करुन, तत्काळ कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश आमदार खताळ यांनी दिले.
अचानक घडलेल्या याप्रकारामुळे पोलिस व महसूल पथकाची चांगलीच धांदल उडाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी 2 लाख रुपयांच्या पिकअप वाहनासह अर्धा ब्रास वाळू ताब्यात घेतली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पोलिस हेड कॉन्स्टेबल हरिदास बांडे यांनी फिर्याद दिली.