तज्ज्ञांच्या निरीक्षणांनुसार सतत थकव्यामागे काही सामान्य कारणं दिसून येतात.
1. चहा, कॉफी, थंड पेयं, दारू, सिगारेट, तंबाखू यासारख्या गोष्टींचे सेवन शरीराला तात्पुरते ताजेतवाने ठेवणारे वाटत असले, तरी अंतिमतः ते शरीराला अशक्त करतं. मोबाईलचे व्यसन शरीराला विश्रांतीपासून दूर नेतं.
2. अनियमित आहार वेळा, नाश्ता न करणे, जंक फूड किंवा फास्ट फूडवर अवलंबून राहणे यामुळे शरीरात पोषणतत्त्वांचा अभाव निर्माण होतो. यामुळेही सतत थकवा जाणवतो. सबब दररोज समतोल, पोषणमूल्यांनी भरलेला आहार घेणं आवश्यक आहे.
3. अॅनेमिया, हायपोथायरॉइडिझम, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्लीप अॅप्नीया यासारख्या आजारांमुळे सतत थकवा येतो. अशावेळी योग्य तपासणी करून उपचार सुरू करणं महत्त्वाचं आहे.
4. शरीरासाठी दररोज 7-8 तासांची शांत झोप आवश्यक असते. उशिरा झोपणं, शिफ्ट ड्युटी, टीव्ही किंवा मोबाईलवर वेळ घालवणं यामुळे झोपेचा ताळमेळ बिघडतो. परिणामी, ऐन सकाळीही आपल्याला थकल्यासारखं वाटत राहतं. यावर उपाय म्हणजे नियमित झोपेचं वेळापत्रक तयार करा आणि त्याचे काटेकोर पालन करा. रात्री लवकर झोपा आणि पहाटे लवकर उठून व्यायाम करा.
5. सततची स्पर्धा, मानसिक ताण, चिंता आणि नैराश्य यामुळे शरीर आणि मन थकून जातं. मानसिक आजारांसाठी योग्य सल्ला आणि उपचार घेतल्यास उत्साह परत मिळवता येतो. मानसोपचारतज्ज्ञांकडे जायचे नसेल, तर किमान दररोज अर्धा तास ध्यानधारणा करावी. सुरुवातीला दहा मिनिटे, पंधरा मिनिटे असे करत रोज 30 मिनिटे ध्यान केल्यास थकव्याची समस्या कायमची संपुष्टात येऊ शकते. याशिवाय, अपुरं पाणी प्यायल्यामुळे थकवा आणि निरुत्साह वाटू शकतो. याखेरीज जड अन्नाचं सेवनही शरीराला सुस्त बनवतं.