Published on
:
07 Feb 2025, 12:54 am
Updated on
:
07 Feb 2025, 12:54 am
पणजी : ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरण अंगलट येणार याची पूर्ण कल्पना असल्याने आणि विरोधक आक्रमक होणार याची कल्पना असल्याने सरकार घाबरले आहे. त्यामुळे केवळ दोन दिवसांचे अधिवेशन ठेवण्यात आले आहे. सरकारच्या या कृतीचा संविधानिक पद्धतीने निषेध करण्यासाठी आपण विधानसभेत फलक झळकावला, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिली.
विधानसभा अधिवेेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सरकारचा निषेध करण्यासाठी आपण काळे कपडे परिधान करून व हातात फलक घेऊन आलो होता. सगळ्या विरोधी गटाला एकसंध करणे आपले काम नाही. संविधानाच्या चौकटीत राहून आपण सरकारला योग्य चपराक दिली असल्याने ते म्हणाले. राज्यपालांचे अभिभाषण हे सरकारचे छापील भाषण आहे. त्याला आपण उद्या योग्य उत्तर देणार आहे. खरी आकडेवारी उघड करून गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था कशी बिघडली आहे, ते आपण दाखवून देणार असल्याचे ते म्हणाले. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना आजारी होते व सोपस्कार म्हणून विधानसभा अधिवेशन घ्यायचे होते. तेव्हा एकदिवसीय विधानसभा अधिवेशन घेण्यात आले. मात्र, त्या वेळी कामकाज सल्लागार समितीला व इतर विरोधकांना विश्वासात घेण्यात आले होते, असे ते म्हणाले.