Published on
:
16 Nov 2024, 11:38 pm
Updated on
:
16 Nov 2024, 11:38 pm
निपाणी /संकेश्वर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर संकेश्वर हद्दीत हरगापूरगडनजीक हॉटेल अयोध्याजवळ पिस्तुलीचा धाक दाखवत फिल्मी स्टाईलने 75 लाख रुपये, 10 लाखांची कार, 5 हजार रुपयांचा लॅपटॉप असा एकूण सुमारे 86 लाखांचा माल लुटल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. घटनेची नोंद संकेश्वर पोलिसांत झाली असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून तपासासाठी स्वतंत्ररित्या कर्नाटक व महाराष्ट्रात चार स्वतंत्र पथके तैनात केली आहेत. महामार्गावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, करणगी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील सूरज संजय व्हनमाने हे केरळ येथून त्यांचे सासरे सराफ व्यावसायिक भरत मरगुडा यांच्याकडील दागिने विक्रीसाठी कोल्हापूरला आले होते. दागिने विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर ते 75 लाखांची रोकड घेऊन कारचालक आरिफ इलाही शेख व कर्मचारी मित्र अजय दगडू सरगरा यांच्यासमवेत केरळकडे कारमधून जात होते. त्यांची कार हरगापूरगड फाट्यावर आली असता हॉटेल अयोध्या समोर पहाटे 4.30 च्या सुमारास मागून दुसर्या कारमधून पाठलाग करत आलेल्या दोघा बुरखाधारी दरोडेखोरांनी त्यांच्या कारसमोर वाहन आडवे लावून सूरज यांच्यासह चालक व अजय यांना पिस्तुलीचा धाक दाखवत कारमधून खाली उतरवले. दोघांपैकी एकाने रोकड व कारचा ताबा घेऊन ते भरधाव वेगाने बेळगावच्या दिशेने पसार झाले. घाबरलेल्या सूरज यांच्यासह चालक व अजय या तिघांनी ठिकाणी तातडीने संकेश्वर पोलिसांशी संपर्क साधला. घटनास्थळी गोकाक विभागाचे डीएसपी डी. एच. मुल्ला, संकेश्वरचे सीपीआय एस. एम. आवजी, उपनिरीक्षक राघवेंद्र खोत, एलसीबी पथकाचे हवालदार मुरगेश जंबगी, सलीम शेख, बी. टी. पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिस अधिकार्यांनी त्या तिघांना विश्वासात घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेचा आधार घेत तपास चालविला. दरम्यान संकेश्वर पोलिसांनी ही घटना आपल्या हद्दीत घडली नसून निपाणीत हद्दीत घडली असल्याचे सांगत निपाणी पोलिसांत तक्रार द्या असे सांगितले. त्यानुसार त्या तिघांनी निपाणी पोलिसाशी संपर्क साधला. अखेर संकेश्वर आणि निपाणी पोलिसांनी हद्द स्पष्ट करून शुक्रवारी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन सूरज व्हनमाने यांच्याकडून रितसर फिर्याद नोंदवून घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शुक्रवारी घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख श्रुती यांनी तर शनिवारी जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी भेट देऊन तपासाची चक्रे गतिमान केली. याप्रकरणी तपासासाठी पोलिसांनी स्वतंत्ररित्या चार पथके कर्नाटक व महाराष्ट्रात रवाना केली आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. पुढील तपास डीएसपी मुल्ला करत आहेत.
महामार्गावर गेल्या पाच वर्षांपूर्वी निपाणी-कोगनोळी हद्दीत औषध वाहतूक करणार्या ट्रक चालकाला शस्त्राचा धारदार दाखवून लुटण्याचा प्रयत्न दरोडेखोरांच्या टोळींकडून झाला होता. यावेळी दरोडेखोरांनी सदर ट्रकचा ताबा घेऊन हा ट्रक सौंदलगा-कुर्ली मार्गावर पाणंद रस्त्यावर थांबून पोबारा केला होता. या घटनेसह अधून-मधून महामार्गावर वाहनधारकांना लुटण्याची किरकोळ प्रकार घडले आहेत. त्यामुळे पोलिसांनी संयुक्तरीत्या रात्रीची गस्त महामार्गावर सुरू ठेवावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.