Published on
:
25 Nov 2024, 12:15 am
Updated on
:
25 Nov 2024, 12:15 am
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. त्यामुळे सिंधुदुर्गच्या पारड्यात दोन मंत्रिपदे पडणार का ? अशी चर्चा आता नाक्या नाक्यावर रंगली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून दीपक केसरकर यांनी सुमारे 40 हजार मताधिक्याने विजय मिळवित सलग चौथ्यांदा आमदार होण्याचा मान मिळविला आहे. मतदारसंघातील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते,महिला यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे, असे मत शिवसेना जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केले.
दीपक केसरकर यांनी गेल्या अडीच वर्षात प्रचंड काम करून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी आणला. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. दरम्यान काही कामे राज्यस्तरीय परवानगीसाठी प्रलंबित आहे. त्यांना मंत्रिपद मिळाले तर प्राधान्याने उर्वरित विकासकामे मार्गी लागतील. शेतकरी, महिला, मच्छीमार, आंबा -काजू बागायतदार ,काजू उद्योजक यांना विविध योजनांचा फायदा करून देण्यासाठी दीपक केसरकर यांना मंत्रीपद मिळणे अत्यावश्यक आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार म्हणून दीपक केसरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. दीपक केसरकर यांनी गेल्या तीन टर्ममध्ये आमदार व मंत्री म्हणून विकासात्मक काम केल्याने या मतदारसंघाचा भरीव विकास करण्यास ते तत्पर आहेत. भविष्यात या मतदारसंघात फक्त केसरकरच सर्वच घटकांसाठी काम करू शकतात. त्यांनी शालेय शिक्षणमंत्री म्हणून शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. तसेच गृहराज्यमंत्री असताना त्यांनी स्तुत्य असे काम केले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या उर्वरित विकासासाठी, रोजगार, आरोग्य हे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी तसेच येथील मतदारसंघाचा पर्यटनद़ृष्ट्या विकास होण्यासाठी दीपक केसरकर यांना पर्यटन मंत्रीपद मिळावे, असे सचिन वालावलकर म्हणाले.
दोन मंत्रीपदे निश्चित मिळतील : दिलीप गिरप,शितल आंगचेकर,वसंत तांडेल
जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेच्या जागांवर महायुतीने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अनुभवी, जुने नेते असलेले व आमदार म्हणून सलग चौथ्यांदा निवडून येत करिष्मा घडविणारे दीपक केसरकर यांना मंत्रिपद मिळणार हे शंभर टक्के निश्चित आहे. कणकवली मतदारसंघातून सलग तिसर्यांदा आमदार म्हणून निवडून येत नितेश राणे यांनी आपली मंत्रीपदाची दावेदारी पेश केली आहे. एक डॅशिंग, प्रखर व्यक्तिमत्व व समाजात सामाजिक कार्यात अग्रेसर असे व्यक्तित्त्व असलेले नितेश राणे हे सर्वांनाच प्रिय आहेत. त्यांची जनतेची व विविध विकासकामे पूर्ण करण्याची हातोटी व डॅशिंग व्यक्तित्त्व यामुळे त्यांनी जनमानसात आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांनी कणकवली-देवगडमध्ये बरीच विकासात्मक कामे केली आहेत. त्यांना देखील मंत्रिपद निश्चित मिळेला,असा विश्वास जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त केला. तर वेंगुर्ले माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, प्रभू खानोलकर यांनी नितेश राणे यांना पालकमंत्री पद मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले दीपक केसरकर यांना मत्स्य संवर्धन खारभूमी खाते मिळावे, अशी प्रतिक्रिया वेंगुर्ले येथील ज्येष्ठ मच्छिमार नेते वसंत तांडेल यांनी व्यक्त केली आहे.