>> दिलीप ठाकूर
आजच्या मनोरंजन क्षेत्रातील विशेष काय? तर ‘मी अमुकच भाषेतील चित्रपटात भूमिका साकारेन’ अशी चौकट अनेकांनी मोडली आहे. सचिन खेडेकरने ‘गुलकरी’ या गुजराती भाषेतील चित्रपटात भूमिका साकारलीय. विशेष म्हणजे, हा चित्रपट म्हणजे त्याची भूमिका असलेल्या ‘मुरंबा’ या चित्रपटाचा रिमेक.
वर्षा उसगावकरने मराठी व हिंदी चित्रपटांबरोबरच राजस्थानी, बंगाली आणि कोंकणी भाषेतील ‘जॉवई नंबर वन’ इत्यादी चित्रपटात भूमिका करण्यात सातत्य ठेवले आहे. आपल्याच एका कोंकणी चित्रपटाचे कर्नाटकातील एका चित्रपटगृहावर भले मोठे कटआऊट पाहून ती विलक्षण सुखावली. सुबोध भावेनेही बंगाली चित्रपटात भूमिका साकारलीय. रेखा राव व रेशम यांनी केव्हाच आसामी चित्रपटात काम केले आहे.
आपल्या मातृभाषेतील चित्रपटसृष्टीत पाय रोवले असताना अन्य भाषिक चित्रपटात भूमिका साकारायची संधी मिळाली तर ती स्वीकारुन आपले अभिनय विश्व समृद्ध करायला हवेच. आजच्या ग्लोबल युगाचे ते एक वैशिष्टय़ आहे. कर्नाटकच्या कानडी, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या तेलगू, तामिळनाडूच्या तमिळ आणि केरळच्या मल्याळम या भाषेतील चित्रपटात अनेक कलाकार भूमिका साकारत आहेत. सयाजी शिंदेची दक्षिणेकडील चारही भाषेतील चित्रपटात यशस्वी घौडदौड सुरु आहे. त्याच्या चित्रपटांची नावे सांगावी तेवढी थोडीच आहेत. देवादासू, यामुदीखी मोगुदू, सॉफ्टवेअर सुधीर, ऑफिसर, मेहबूबा, इंटेलिजन्स, ऑक्सिजन, स्पायडर, ध्रुव इत्यादी तेलगू, भारती, थानेलवम, संतोष सुब्रमण्यम, आधवन इत्यादी तमिळ तर ओरु कर ओरु वगैरे कानडी भाषक चित्रपटातून त्याची वाटचाल सुरु आहे.
दक्षिणेकडील चित्रपट म्हणजे अतिशय भडक अतिशयोक्तीपूर्ण आणि काही मनोरंजक चित्रपट. अनेकांनी मनोरंजक चित्रपटात भूमिका साकारल्या व त्यातून चांगले मानधनही मिळते. काही मराठी स्टार दक्षिणेकडील चित्रपटात काम करण्याचे खूप चांगले अनुभव आवर्जून सांगतात. थीम आणि व्यक्तिरेखा यांची माहिती अगोदर मिळते. चरित्रपटात भूमिका साकारताना जी व्यक्तिरेखा साकारायचीय त्याची सविस्तर माहिती मिळते. तर मराठी अभिनेत्रींना दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटात भूमिका साकारताना विदेशात गाण्याचे शूटिंग आणि कधी एखाद्या विदेशी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपला तेलगू अथवा तमिळ चित्रपट दाखल झाल्याने जाण्याची संधी.
सचिन खेडेकरने ऐंशीच्या दशकात आंध्र प्रदेशातील लोकप्रिय अभिनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एनटी. रामाराव यांच्या आयुष्यावर आधारित चरित्रपट ‘एनटीआर महानायकुडू’ आणि याच तेलगू चित्रपटाचा सिक्वेल एनटीआर कथानायकुडू अशा तेलगू चित्रपटात भूमिका साकारली आहे. तसेच तेलगुमध्ये लव्हर, नेनू लोकल, मल्याळममधील पोलीस, तमिळमधील मैथरम, दिइवा थिरुमगल, यावरम नालारु, इंद्रजीत इत्यादी चित्रपटात भूमिका साकारल्या. मराठी कलाकारांना दक्षिणेकडील मान्यवर दिग्दर्शक (मणिरत्नम वगैरे) अथवा कलाकारासोबत भूमिका साकारण्याचा अनुभव येतो तेव्हा ते भारावून न जाता, त्यापासून नवीन गोष्टी कशा शिकता येतील याकडे लक्ष देतात. जयवंत वाडकरने मामुट्टीसोबत सलिम महम्मद यांच्या ‘पथेमरी’ या मल्याळम चित्रपटात भूमिका साकारताना तेच केले आणि तेव्हा गप्पिष्ट जयवंत वाडकरचा मामुट्टीशी चांगले सूर जुळले.
अतुल कुलकर्णीने भूमीगीथा, आ दीनगालू (कानडी), जयम मनाडे रा, अंधरवाला, चान्टी, गोवरी, पंजा इत्यादी तेलगु, तसेच डी सेव्हन्टीन, मानसरोवर इत्यादी मल्याळम तसेच केडी, रन वगैरे तमिळ चित्रपटात भूमिका साकारल्या. कमल हसनच्या ‘हे राम’ या एकाच वेळेस तेलगु आणि हिंदीत निर्माण झालेल्या चित्रपटात त्याची भूमिका होती.
राधिका आपटे तर चौफेर वाटचाल करीत असलेली अभिनेत्री. रक्तचक्र, धोनी, लिजण्ड, लीऑन या तेलगु तर ऑल इन ऑल अझ्हाघु, वेर्ती सेल्वन, कबाली, चिथीवम पेसुथडी या तमिळ तसेच हरहरन या मल्याळम भाषेतील चित्रपटात भूमिका साकारल्या. यातील ‘कबाली’ हा मूळ तमिळ चित्रपट तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत डब होऊन जगातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. उर्मिला मातोंडकरने ‘चाणक्यम’ या मल्याळम चित्रपटात भूमिका साकारली. त्यानंतर तिने रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘अंथम’, ‘गायम’, अनागहगा ओका रोजू या तामिळ सिनेमात भूमिका साकारल्या. ‘अंथम’ हा चित्रपट तामिळ आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत निर्माण झाला. हिंदीत त्याचे नाव द्रोही होते. सोनाली कुलकर्णीने (सिनियर) चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकले तेच ‘चेलूवी’ या कन्नड चित्रपटातून! गिरीश कर्नाड हे तिचे आदर्श. त्यानंतर तिने मे माधम या तामिळ चित्रपटात भूमिका केली. श्रुती मराठेने दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटात श्रुती प्रकाश या नावाने करिअर केले. तिने इंदिरा विझहा, नान अवनील्लाई, गुरु शिष्यम, अरावत, मायाबाजार या तमिळ चित्रपटात तर आडू आटा आडू या कन्नड चित्रपटात भूमिका साकारली. ‘इंदिरा विझहा’ हा चित्रपट अब्बास मस्तान दिग्दर्शित ‘ऐतराज’चा रिमेक आहे. नेहा पेंडसेने दक्षिणेत उत्तम लोकप्रियताही संपादली. तिने सोन्थम, व्हीधी राऊडी या तेलगू, मौनम पेसिअदे, इन्धु इन्धु काधल इन्धु या तामिळ, मेड इन युएसए, अब्राहम अॅण्ड व्हायोलिन, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, स्नेक अॅण्ड लॅडर या मल्याळम आणि इन्स्पेक्टर झांशी (कन्नड) अशा चित्रपटात भूमिका साकारल्या. महेश मांजरेकरची एकूणच वाटचाल आक्रमक आणि प्रत्येक नवीन संधीला स्वीकारायचे अशी. त्यांनी तेलगु भाषेतील होमन, अडरुस, डॉन सोनू, गुन्टूर टॉकीज या चित्रपटात तर तमिळमध्ये आरंभम या चित्रपटात भूमिका साकारली. विशेष म्हणजे त्यांची भूमिका असलेला साहो हा चित्रपट एकाच वेळेस तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा तीन भाषेत पडद्यावर आला. कलाकारांसोबत दिग्दर्शकही बहुभाषिक चित्रपटासाठी काम करत असल्याने ही वाटचाल वाढत चालली आहे.