पालक सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी केला क्षेत्रीय पाहणी दौरा
Published on
:
06 Feb 2025, 9:50 am
Updated on
:
06 Feb 2025, 9:50 am
धुळे | केंद्र व राज्य शासनामार्फत सर्वसामान्य नागरीकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची तसेच महत्वाचे प्रकल्प, शासकीय धोरणाची अंमलबजावणी व्यवस्थित होऊन त्या योजना शेवटच्या घटकापर्यंत व्यवस्थितरित्या पोहचून त्यांची अंमलबजावणी आखणी केल्यानुसार होत असल्याची खातरजमा करण्यासाठी प्रधान सचिव कृषि (विस्तार) तथा धुळे जिल्ह्याचे पालक सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी क्षेत्रीय पाहणी दौरा केला. या दौ-यात त्यांनी शेतकरी, कंपनी सभासद, प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधुन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
राजयाचे प्रधान सचिव कृषि (विस्तार) तथा धुळे जिल्ह्याचे पालक सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी धुळे तालुक्यातील विविध ठिकाणी भेट देवून क्षेत्रीय पाहणी केली. यात सुरवातीला लामकानी, ता. धुळे येथील लामकानी फार्मर प्रोड्युसर कंपनी येथे स्मार्ट योजनेतंर्गत हळद प्रक्रिया युनिट तसेच गट शेती योजनेतंर्गत मुरघास युनिटला भेट दिली. यावेळी पालक सचिव रस्तोगी यांनी प्रकल्पातील महिला सभासदांना शेअर सर्टिफिकेटचे वाटप केले. तसेच स्मार्ट प्रकल्पातील युनिट विषयी सविस्तर माहिती जाणून घेवून कंपनीस विक्री व्यवस्थेविषयी मार्गदर्शन केले.
यानंतर त्यांनी बोरीस येथील सीएससी केंद्रावर ॲग्रीस्टॅक शेतकरी आयडी तयार करण्यासाठी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच ॲग्रीस्टॅक शेतकरी आयडी तयार करण्यासाठी येत असलेल्या ऑनलाईन अडचणीबाबत माहिती जाणून घेत कृषि, महसुल व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना ॲग्रीस्टॅक शेतकरी आयडीच्या कामास वेग देण्याच्या तसेच गावस्तरावर शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या.
पालक सचिवांनी रस्तोगी यांनी वडणे येथील कृषि भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी दिलीप रामदास पाटील यांच्या शेतावर भेट देऊन ऑरगॅनिक फार्मिंगचे मॉडेल फार्म विकसित केल्याबाबत समाधान व्यक्त केले. त्यासोबतच तालुक्यातील इतर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जोडण्यासाठी अशा प्रकारचे मॉडेल फार्म जिल्ह्यातील इतर तालुक्यात उभे करण्यासाठी कृषि विभाग व आत्माच्या अधिकाऱ्यांना सुचना केल्या.
प्रधानमंत्री सुक्ष्म व अन्न प्रक्रिया युनिट नगाव, ता. धुळे येथील श्रीमती सिमा योगेश्वर पाटील यांच्या राजगिरा लाडू प्रक्रिया उद्योगास भेट देऊन संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली तसेच लाभार्थ्यास विक्री व्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर राजगिरा सोबत शेंगदाणे, तीळ लाडू व चिक्की बनवण्यासाठी व उद्योग व्यवसाय वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कृषि विभागातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर (नाशिक), सुरज जगताप (धुळे), कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. दिनेश नांद्रे, तालुका कृषि अधिकारी व्ही. आर. प्रकाश, संजय पवार, मंडळ कृषि अधिकारी भालचंद्र बोरसे आदिंसह शेतकरी, सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.