आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं, निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोपांच्या जोरदार फैरी झाडण्यात आल्या. विशेषत: 2019 ला महाराष्ट्रातल्या दोन बड्या पक्षांमध्ये मोठी फूट पडली होती. आधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केला, त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनले. त्यानंतर पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण आणि नाव देखील एकनाथ शिंदे यांनाच मिळालं. तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील शरद पवार यांची साथ सोडत भाजपला पाठिंबा दिला. अजित पवार यांना देखील राष्ट्रवादीचं पक्ष चिन्ह असलेलं घड्याळ आणि पक्षाचं नाव मिळालं. मात्र त्यानंतर चारही गटाकडून आम्हीच खरा पक्ष असल्याचा दावा करण्यात येत होता. यावरून एकमेकांवर जोरदार टीका देखील करण्यात आली.
पक्षांमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे, त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. विधानसभेचं मतदान होताच आता एक्झिट पोल समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसताना दिसत आहे, त्या तुलनेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जास्त जागा निवडून येताना दिसत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे, ठाकरे गटाच्या अधिक जागा निवडून येताना दिसत आहेत.
टीव्ही 9 च्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीला एकूण 129 ते 139 जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला 136-145 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाला राज्यात 25 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला 44 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाला 23 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यात आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 42 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरही काही पोलमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अधिक जागा दाखवण्यात आल्या आहेत.