Mahakumbh 2025 : अनर्थ का टळत नाहीत..?

2 hours ago 2

महाकुंभ 2025 चेंगराचेंगरीPudhari File Photo

arun patil

Published on

02 Feb 2025, 12:24 am

Updated on

02 Feb 2025, 12:24 am

योगेश मिश्र, ज्येष्ठ पत्रकार, लखनऊ

महाकुंभमेळ्यासाठी देशभरातून अलोट गर्दी होत असताना व्यवस्थापनाच्या नाकीनऊ येणे स्वाभाविक आहे. अशा वेळी भाविकांनीदेखील संयम राखणे तितकेच महत्त्वाचे असते. कारण अतिउत्साह, आवेश यामुळे उद्भवणार्‍या अघटिताचा अंतिमतः फटका त्यांनाच बसणार असतो. ही बाब यापूर्वीच्या घटनांतून अनेकदा दिसून आली आहे. पण आपण त्यातून काहीच शिकत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

देशात धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणावर होते आणि या गर्दीवर योग्य नियंत्रण ठेवले गेले नाही तर चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना घडतात. ही बाब आता नवीन राहिलेली नाही. गेल्या काही वर्षांत भारतामध्ये अनेक ठिकाणी चेंगराचेंगरीच्या भीषण घटना घडल्या आहेत आणि त्या आयोजकांसाठी, प्रशासनासाठी आणि नागरिकांसाठी धडा ठरल्या आहेत. 1954 च्या कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत झालेला 800 हून अधिक लोकांचा मृत्यू, 2005 मधील महाराष्ट्रातील मांढरदेवी दुर्घटना, 2011 मधील साबरीमाला मंदिरातील मकरविलक्कू उत्सवावेळी परतीच्या मार्गावर गोंधळ उडून झालेली चेंगराचेंगरी, 2013 मध्ये मध्य प्रदेशातील रतनगड मंदिरात दुर्गापूजा उत्सवावेळी अफवेमुळे उडालेला गोंधळ, 2022 मध्ये वैष्णोदेवी मंदिरात झालेली दुर्घटना अशा अनेक दुर्घटनांचा खेदजनक इतिहास आपल्या गाठीशी आहे. दरवेळी अशा दुर्घटना घडल्यानंतर त्याचा तपास करण्यासाठी चौकशी समित्या स्थापन होतात, त्या अहवाल सादर करतात. त्यातून गर्दी नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे पुढे येतात. परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यामुळे पुन्हा दुर्घटना घडत राहतात. प्रयागराजमधील ताज्या घटनेने या मालिकेत नवे पुष्प जोडले गेले आहे.

चाळीस दिवस चालणार्‍या महाकुंभमेळ्याला निम्मे दिवसही झाले नाहीत, तोवर तेथे दुर्घटना घडली. अर्थात उसळणारी गर्दी पाहता अशा प्रकारची घटना घडण्याची भीती सतत वाटतच होती. प्रयागराजच्या कुंभमेळ्याची जबाबदारी उत्तर प्रदेशात सत्तेत असणार्‍या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर आहे. सरकारने व्यापक प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आणि भाविकांना सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा केला आहे. परंतु प्रचंड गर्दी, ढिसाळ व्यवस्थापनामुळे मौनी अमावस्येला संकट टाळता आले नाही. दहा-बारा दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन महाकुंभातील तंबूंना आग लागण्याची घटना घडली होती. त्यानंतर आयोजक अधिक सतर्क झाल्याचे सांगितले जात होते. परंतु आताच्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे आयोजनात उणिवा राहिल्या हे स्पष्ट झाले. एक महत्त्वाची बाब म्हणजे, अशा प्रकारच्या घटनेला कोणा एकाला जबाबदार धरता येणार नाही. कारण लहान सहान चुकांची जेव्हा गोळाबेरीज होते तेव्हा अशा प्रकारच्या घटनेला सामोरे जावे लागते. कुंभमेळ्यात घडलेली ही पहिली दुर्घटना नाहीये. 1954 मध्ये प्रयागराज, 2013 मध्ये प्रयागराज, 2010 मध्ये हरिद्वार, 2003 मध्ये नाशिक, 1992 मध्ये उज्जैन या ठिकाणी झालेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, पळापळ होऊन अनेकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमीदेखील झाले.

2025 चा महाकुंभमेळा वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले. 144 वर्षांनंतर शुभयोग आल्याने या कुंभमेळ्याला आणखीनच महत्त्व आले. कुंभमेळ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम, धार्मिक विधी करण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. हे लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर निधी खर्चून आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत आयोजन करण्यात आले. विशेषतः चेंगराचेंगरीसारख्या प्रत्येक गोष्टी टाळण्यासाठी आणि त्यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला जात आहे. वाहनतळ, मार्ग वळविणे, बॅरिकेडिंग, पोलिसांची नियुक्ती आदी गोष्टींबाबत योगी सरकारचे प्रशासन दक्ष आहे, असे सांगितले जात होते. प्रत्यक्ष महाकुंभातही व्यवस्थापनातील क्रियाकलाप चोखपणे पार पडताना दिसत होते. परंतु घडलेल्या दुर्घटनेमुळे या सर्वांवर पाणी फेरले गेले.

वस्तुतः या दुर्घटनेमागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे अमृतस्नासाठी एकाचवेळी जमणे. मनातील आध्यात्मिक श्रद्धा आणि गंगा मातेवरची निस्सीम भक्ती बाळगत कोट्यवधी भाविक देशातून, तसेच जगभरातून प्रयागराजकडे मार्गस्थ झाले. कुंभमेळ्यात येण्यासाठी भाविकांना प्रोत्साहन मिळत गेले आणि पाहता पाहता गर्दी वाढत गेली. कुंभमेळ्यात काही कोटी भाविकांची गर्दी होणार असल्याचे गृहित धरून तयारी करण्यात आल्याचे सांगितले गेलेे. देशभरातून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. बसची शटल सेवा सुरू करण्यात आली. विमान उड्डाणांची संख्या देखील वाढवण्यात आली. व्यवस्थेबाबत करण्यात येणारे दावे, मोठी प्रसिद्धी आणि सोशल मीडियामुळे कुंभमेळ्याच्या प्रसिद्धीने कळस गाठला आणि प्रत्येकजण एकदा तरी कुंभमध्ये जाण्यास सज्ज झाला. नवीन परंपरा, प्रथा आणत पहिल्यांदाच देशभरात राज्य सरकारांना कुंभमेळ्याचे निमंत्रण देण्यात आले. एकार्थाने लोकांना कुंभमेळ्यात पाठविण्यासाठी सर्वजण एकत्र प्रयत्न करू लागले. पण यातून लोकांचा ओघ वाढतच गेला आणि मौनी अमावास्येच्या पहाटे अप्रिय घटना घडली. वास्तविक संगमापर्यंत जाण्याचा एक मार्ग आणि परतीचे तीन मार्ग अक्षयवट मार्ग, महावीर मार्ग आणि जगदीश रॅम्प निश्चित केले होते. आणीबाणीसाठी ग्रीन कॉरिडॉरदेखील तयार केला होता. मौनीच्या दिवशी सर्वांनाच अमृतस्नान करायचे असल्याने भाविकांना आदल्यादिवशी रात्री बॅरिकेडजवळ आणि गंगा नदीच्या किनार्‍यावर थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. किनार्‍याला जोडणारे पूलही बंद केले होते. अर्थात व्हीआयपी मंडळींसाठी जशी व्यवस्था केली जाते, तशी व्यवस्था सामान्यांसाठी कधीच नसते आणि या कुंभमेळ्यातही दिसली नाही. पण संगमावर प्रचंड गर्दी उसळण्याचा अंदाज असताना तेथे भाविकांना का जाऊ दिले, असा प्रश्न आहे. घाटांजवळील थांबण्याच्या ठिकाणच्या परिस्थितीची सरकारने योग्यपणे हाताळणी का केली नाही?

चेंगराचेंगरी झाल्यानंतर प्रशासनाने नजीकच्या संगमावर किंवा काठावर अमृतस्नान करण्याचे आवाहन केले. परंतु हे आवाहन दुर्घटना घडण्याच्या अगोदरही करता आले असते. शिवाय मौनी अमावास्येलाच अमृतस्नान करणे गरजेचे नसून तीन दिवसांत कधीही अमृतस्नान केले तर फळ मिळेल, अशा प्रकारची माहिती आधी का दिली गेली नाही? दुसरीकडे भाविकांची मानसिकता आणि अतिउत्साहदेखील या घटनेला तेवढाच जबाबदार मानता येईल. संगमाजवळ पोहोचल्यानंतर घाईगडबड करण्याचे कारणच काय? बॅरिकेडस् तोडून संगमाकडे धाव घेण्यामुळे गोंधळ-गडबड होणार हे अटळ होते. दुसरे असे की, साधूमंडळी शाही स्नान नंतर करू शकतात, तर जनता का करू शकत नाही? साधारणपणे कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात आपण कुटुंबासह सहभागी होतो. पण महिला आणि मुलांना गर्दीचा अनुभव नसतो. परिणामी ते कोणत्याही आपत्तीच्या काळात धैर्याने उभे राहू शकत नसल्याने गोंधळून जातात. गर्दीला प्रचंड आवेश, वेग असतो. सर्वचजण या आवेशात एकाचवेळी सक्रिय होतात. गर्दी जसजशी वाढत जाते, तसतसे लोक त्यात हरवतात. स्वत:चा विचार केला जात नाही. यामुळे इच्छा नसतानाही लोकांना जमावासमवेत जावे लागते. प्रचंड गर्दीत बुद्धी, विचार, विवेक याला थारा राहात नाही. केवळ आवेश हावी होतो. त्यातून अशा दुर्घटना घडतात.

खरे म्हणजे अशा घटनांना सरकार आणि भाविक दोघेही तेवढेच जबाबदार ठरतात. सर्वांत मोठी आणि खेदाची बाब म्हणजे आपण जुन्या घटनांतून काहीच शिकत नाही. कोट्यवधी संख्येने लोक जमत असतील तर अशा प्रकारची घटना घडेल, असे म्हणून जबाबदारी झटकता येणार नाही. एका व्यक्तीचा मृत्यूदेखील व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारा आहे, पोलखोल करणारा आहे. आपल्या व्यवस्थेला मानवी जीवनाचे मोल कधी समजणार आहे की नाही, हा यातील खरा प्रश्न आहे. मागील काळात सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या गर्दीच्या ठिकाणी अघटित घटना घडू नयेत यासाठी काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे आणि निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार कार्यक्रम स्थळांवर प्रवेश आणि निर्गमनासाठी स्वतंत्र आणि पुरेसे मार्ग असावेत, गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचार्‍यांची नेमणूक करावी, कार्यक्रम स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर देखरेख यंत्रणा बसवून सतत देखरेख ठेवण्यात यावी, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित वैद्यकीय मदत मिळण्यासाठी वैद्यकीय पथके आणि सुविधा उपलब्ध असाव्यात, आपत्कालीन परिस्थितीत लोकांना बाहेर पडण्यासाठी स्पष्ट आणि मोकळे मार्ग असावेत, विविध भाषांमध्ये सूचना फलक आणि घोषणा व्यवस्था असाव्यात, ज्यामुळे लोकांना आवश्यक माहिती मिळू शकेल अशा काही प्रमुख सूचनांचा त्यात समावेश आहे. महाकुंभ दरम्यानच नव्हे तर बहुतांश ठिकाणी याची अंमलबजावणी केली जाते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने लोकांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिमा राबवाव्यात, असेही सांगितले होते. त्याबाबत शासन-प्रशासन आणि आयोजक फारसे गंभीर दिसत नाहीत. तसेच भाविक किंवा गर्दीस्थळी जमणारा समुदायही सुरक्षिततेच्या मुद्द्याचा विचार करत नाही. त्यामुळे अनर्थ घडणेही टळत नाही.

खरे पाहता जागतिक पटलावर चर्चिल्या गेलेल्या महाकुंभाचे आयोजन ही भारतासाठी एक सुसंधी होती. कोणत्याही दुर्घटनेशिवाय हा महाकुंभ पार पडला असता तर जगभरात भारताने एक नवा आदर्श घालून दिला असता. कोट्यवधीने जमणार्‍या गर्दीचे योजनाबद्ध व्यवस्थापन करण्याची क्षमता आपल्या देशात आहे, हे जगाला दाखवून देता आले असते. उद्याच्या भविष्यात भारत ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्तरावरील स्पर्धांसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी महाकुंभ हा माईलस्टोन ठरला असता. परंतु इतका दूरदर्शी विचार करण्याची आपल्याला सवयच नसल्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार घडत राहतात. या चेंगराचेंगरीचा आणखी एक धडा म्हणजे केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थापन निर्धोक बनवता येत नाही, तर ते तंत्रज्ञान हाताळणार्‍यांमध्ये आणि ज्यांच्यासाठी हाताळले जात आहेत, त्यांच्यामध्ये सतर्कता, विवेक, संवेदनशीलता असणेही गरजेचे असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article