प्रचार सभांतून नरेंद्र मोदी यांनी ‘हम एक है’ अशी मतदारराजाला साद घातली आणि मतदार राजाने त्यांना भरभरून प्रतिसाद दिला.Pudhari File Photo
Published on
:
23 Nov 2024, 11:38 pm
Updated on
:
23 Nov 2024, 11:38 pm
संपूर्ण देशाचे आणि जगातील प्रमुख माध्यमांचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीने अभूतपूर्व यश संपादन करून नवा इतिहास घडविला आहे. एकेकाळी महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष जबरदस्त प्रबळ होता आणि विरोधक काँग्रेसच्या पासंगालाही पुरत नव्हते, तेव्हा काँग्रेस पक्षाने दोनशेपर्यंत जागा जिंकल्या होत्या; पण यावेळी विरोधकांचे आव्हान असतानाही भाजपप्रणीत महायुतीने राज्यात द्विशतकी विजयी त्सुनामी घडवून आणली. हे सारे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याचे आणि राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे. प्रचार सभांतून नरेंद्र मोदी यांनी ‘हम एक है’ अशी मतदारराजाला साद घातली आणि मतदार राजाने त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. या निवडणुकीतून पंतप्रधान मोदी यांच्यावरील आम जनतेचा विश्वास अधोरेखित झाला आणि फडणवीस यांच्या नेतृत्वावरही जनतेने शिक्कामोर्तब केले. भारतीय जनता पक्षाने 149 जागा लढवल्या होत्या. भाजपचा स्ट्राईक रेट (विजयी होण्याची टक्केवारी) 85 टक्क्यांहून अधिक आहे. याचा अर्थ शहरीबरोबर ग्रामीण भागातही भाजपची पाळेमुळे खोलवर गेली आहेत. जनतेचा विश्वास हेच त्याचे रहस्य आहे. महाराष्ट्राच्या आजवरच्या निवडणुकांत ज्या काही अटीतटीच्या, ईर्ष्येच्या आणि चुरशीच्या निवडणुका झाल्या, त्यात या विधानसभा निवडणुकीचा समावेश केला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत भाजप संविधानात बदल करील, असा प्रचार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. शिवाय अल्पसंख्याकांनी महाविकास आघाडीला एकगठ्ठा पाठिंबा दिला होता. त्यामुळे ‘मविआ’ला चांगले यश मिळाले होते. त्या तुलनेत महायुती बॅकफूटवर गेली होती. भाजप आणि मित्रपक्ष सावधगिरीने व्यूहरचना करीत होते.
मागील पाच वर्षांतील पहिल्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्या काळात महाविकास आघाडीची फारशी प्रभावी कामगिरी झाली नाही. त्यानंतरच्या अडीच वर्षांत महायुतीने मात्र धडाकेबाज निर्णय घेतले. तत्पूर्वी, मागील पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी लोकाभिमुख कारभार केला. अनेक महत्त्वाचे निर्णय राबवले. पुढील अडीच वर्षांत विरोधी पक्षनेते या नात्यानेही त्यांनी प्रभावी कामगिरी केली. नंतरच्या अडीच वर्षांत सत्तेवर असताना अनेक दूरगामी निर्णय राबवित त्यांनी सरकार गतिमान केले. त्यांच्या या कामगिरीमुळे भाजपची संघटना तळागाळात रुजली आणि भक्कम झाली. देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीतील त्रुटी दूर करण्याचा चंगच बांधला आणि त्यातून एकामागून एक अशा लोकानुनयी अशा योजनांच्या घोषणा केल्या आणि त्याची तातडीने यशस्वी अंमलबजावणीही केली. लाडकी बहीण योजना हुकमाचा एक्का ठरला. लाडक्या बहिणीला दरमहा 1500 रुपये मदत देण्याच्या योजनेचा मोठा प्रभाव पडला. सुमारे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. वेगवेगळ्या जाती-पातींच्या कल्याणासाठी महामंडळे स्थापन करण्याचा धडाडीचा निर्णय त्या-त्या जाती-पातींना दिलासा देणारा ठरला. तीर्थदर्शन योजनेमुळे भाविक वर्गाला महायुतीविषयी जवळीक निर्माण झाली. या आणि इतर अनेक कल्याणकारी योजनांमुळे जनतेचा महायुती सरकारवरचा विश्वास वाढला.
विरोधकांनी विशेषतः लाडकी बहीण योजनेवर टीकास्त्र सोडले. विरोधकांनी सत्तेवर आल्यावर या योजनेतील अनुदान 1500 च्या दुप्पट म्हणजे तीन हजार करू, अशी घोषणा केली. ही योजना निवडणुकीनंतर बंद होईल, अशीही टीका केली; पण महायुतीने यापुढेही योजना चालूच राहील आणि अनुदान 2100 रु. होईल, असे जाहीर करून विरोधकांच्या प्रचारातील हवाच काढून घेतली. या प्रचार मोहिमेत विरोधकांनी गद्दार आणि पक्ष फोडाफोडी हे जुनेच मुद्दे उगळले; पण त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. याउलट महायुतीकडे काही ठोस योजना आणि कार्यक्रम असल्याची खात्री जनतेला पडली. त्या प्रमाणात विरोधकांची गॅरंटी वाटली नाही. लोकसभा निवडणुकीवेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा महायुतीला त्रासदायक ठरला होता. यावेळी महायुतीने हा मुद्दा संयमाने हाताळल्याचे दिसून आले. वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आणि मराठा आरक्षणासारख्या प्रश्नावरील महायुतीची सकारात्मक भूमिका यामुळे निर्माण झालेल्या विश्वासार्हतेचे प्रतिबिंब निकालात उमटले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीच्या राजकारणात आणला. पण त्यांना यश आले नाही आणि आता जरांगे फॅक्टर या निवडणुकीने निष्प्रभच झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘हम एक है, तो सेफ है।’ ही वस्तुस्थिती मांडली, तर योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ हे वास्तव स्पष्ट केले. त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचेही दिसून आले. कल्याणकारी योजना विशेषतः लाडकी बहीण आणि नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांचे आवाहन यातून मतदानाची टक्केवारी वाढली.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदानाची टक्केवारी 61.4 टक्के होती, ती यावेळी 65 टक्क्यांवर गेली. मतदान साडेचार टक्क्यांहून अधिक वाढले आणि ते बहुरंगी महायुतीकडे वळले, असे म्हणायला प्रत्यवाय नाही. सत्तारूढ महायुतीची निवडणुकीसाठी अशी भरभक्कम तयारी असताना, विरोधी महाविकास आघाडीवर मुख्यमंत्री कोण, यावरून वितंडवाद सुरू होता. जागा वाटपावरूनही महाविकास आघाडीत रणकंदन झाले. या अंतर्गत संघर्षाचा फटकाही महाविकास आघाडीला बसला. त्यात भर पडली ती शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या बेजबाबदार वक्तव्यांनी. या वाचाळवीरांच्या वक्तव्यांनीही आघाडीअंतर्गत कलह आणखी उफाळला. आघाडीला नामोहरम करायचे महायुतीचे काम या आघाडीअंतर्गत संघर्षाने सोपे केले, त्याचा फटका काँग्रेसला सर्वाधिक बसला. एकेकाळी दोनशेवर जागा जिंकणार्या काँग्रेसला विशीच्या आतील जागांवर समाधान मानावे लागले. ज्येष्ठ आणि मातब्बर नेते शरद पवार यांना त्यांचे पुतणे अजित पवार यांनी चांगलाच धक्का दिला. काकांपेक्षा दुपटीहून अधिक जागा जिंकून पुतण्याने काकांना आपली जागा दाखवून दिली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त शह दिला. विरोधी आघाडीची पूर्ण वाताहात झाली. विरोधी पक्षांना आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहेच, कारण भविष्यात त्यांना अस्तित्वाची लढाई द्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांची पुरेपूर कसोटी लागणार आहे.