Published on
:
02 Feb 2025, 12:28 am
Updated on
:
02 Feb 2025, 12:28 am
कराड : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ’जी.बी.एस.’ अर्थात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्रातही जी.बी.एस.च्या रूग्णांमध्ये वाढ झाली असून, कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये एका जी.बी.एस.च्या रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णाला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला असून, अन्य तिघांवर सध्या उपचार सुरू आहेत.
गुइलेन बॅरे सिंड्रोम हा ऑटोइम्यून डिजीज आहे. यामध्ये रुग्णाला विषाणू किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग झाला असल्यास, हा आजार जडण्याची शक्यता वाढते. थकवा, झिणझिण्या आणि पाय-हातांमधील कमजोरी ही याची प्रमुख लक्षणे आहेत. वाळवा तालुक्यातील 36 वर्षीय रुग्ण हाता-पायातील ताकद कमी झाल्याने गेल्या आठवड्यात कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी व अन्य चाचण्या केल्या असता त्याला या आजाराचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी या रुग्णावर उपचार सुरू केले. आठवडाभराच्या उपचारानंतर रुग्णाच्या प्रकृतीत पूर्ण सुधारणा झाल्यानंतर, त्याला नुकताच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये वाळवा तालुक्यातील 21 वर्षीय युवक आणि कराड तालुक्यातील 11 व 12 वर्षीय दोन मुली अशा तिघांवर उपचार सुरू आहेत. कृष्णा हॉस्पिटलमधील वैद्यकीय पथक या रुग्णांची विशेष काळजी घेत आहे. या रुग्णांच्या प्रकृतीतही वेगाने सुधारणा होत असल्याची माहिती हॉस्पिटलचे वैद्यकिय संचालक डॉ. विजय कणसे यांनी दिली.
गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात जी.बी.एस.च्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, याबद्दलची कोणतीही लक्षणे आढळल्यास अशा रुग्णांनी तात्काळ कृष्णा हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घ्यावी. स्वच्छता, शुद्ध पाणी, आरोग्यदायी आहार आणि तत्काळ उपचार यांच्याद्वारे जी.बी.एस.पासून स्वतःचे संरक्षण करता येते. जी.बी.एस.च्या रुग्णांना सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार देण्यासाठी कृष्णा हॉस्पिटल तत्पर असल्याचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.
जीबीएस रुग्णांवर ‘कृष्णा’त मोफत उपचार...
’जी.बी.एस.’ या आजाराची बाधा झाल्यास रुग्णांना विशिष्ट प्रकारची इंजेक्शन द्यावी लागतात. या इंजेक्शनसाठी सुमारे दीड ते दोन लाखापेक्षा जास्त खर्च येतो. पण कृष्णा हॉस्पिटलने महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेतून या रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करत, या रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे.