कोल्हापूर : करवीरनगरीत प्रथमच महानगरांच्या तोडीचा भव्य लाईव्ह शो सादर करण्यासाठी कोल्हापुरात आलेली महाराष्ट्राची लाडकी संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी करवीर निवासिनी अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री जोतिबाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. महासैनिक दरबार मैदानावर खास उभारण्यात आलेले स्टेज आणि हजारो रसिकांच्या साक्षीने रविवारी (दि. 2) अजय अतुल शोचा महासोहळा रंगणार आहे.
भवानी मंडपाच्या मुख्य कमानीपासून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मंदिराकडे प्रस्थान करत दोघे बंधू कुटुंबीयांसमवेत देवी चरणी नतमस्तक झाले. पारंपरिक संगीताला आधुनिकतेचा साज देणार्या गाण्यांतून गोंधळ गीत गाणार्या अजय आणि अतुल यांनी जणू ‘अंबे गोंधळाला ये’ अशी भावनिक सादच अंबाबाईला घातली. त्यानंतर वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबाचे दर्शन घेत ‘चांगभलं’चा गजर केला. गेली 25 वर्षे अजय-अतुल यांच्या संगीताने मराठी मनाचा ठाव घेतला आहे. याचा एकत्रित अनुभव कोल्हापूरकरांना घेण्याची संधी या लाईव्ह शोमधून मिळणार आहे. पारंपरिक संगीताला आधुनिकतेचा साज चढवत या दोघा बंधूंनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
मराठी गाण्यांचा एवढा भव्य शो करणे एक आव्हानात्मक असे काम आहे. मराठी गाण्यांचा असा गौरव होणं ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे. अजय-अतुल यांच्या संगीताने मराठी लोकसंगीताला सातासमुद्रापार नेले आहे. कोल्हापुरातील जनता रसिक आहे. आम्ही इथे परफॉॅर्म करण्यासाठी उत्सुक आहोत, असे अजय-अतुल यांनी म्हटले आहे. आमची गाणी ही रसिकांची आहेत. जेव्हा आम्ही गाणी सादर करतो, तेव्हा लोक त्यांच्या त्या काळातील आठवणींशी कनेक्ट होतात, असे अजय यांनी सांगितले.
महासैनिक दरबार मैदानात रंगणार संगीत महासोहळा
कोल्हापूरकरांसाठी आयोजित संगीताचा अनोखा सोहळा रविवार दि. 2 रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत रंगणार आहे. या सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, चाहत्यांनी तिकिटांसाठी मोठी गर्दी केली आहे. तिकीट विक्री ऑनलाईन व ऑफलाईन सुरू असून सोबतचा क्यूआरकोड स्कॅन करून तिकीट बुकिंग करता येईल. ग्रुप बुकिंगवर मोठा डिस्काऊंट देण्यात येत आहे. अजय-अतुल यांच्या अनेक सुपरहिट गाण्यांवर प्रेक्षकांना थिरकता यावे यासाठी संपूर्ण टीमने विशेष तयारी केली आहे. त्यांच्या गाण्यांत कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब उमटते. त्यामुळे त्यांच्या या भेटीला वेगळे भावनिक महत्त्व आहे.
चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अजय-अतुल मंदिर परिसरात पोहोचताच चाहत्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली. मंदिर व्यवस्थापनाने त्यांना दर्शनाची विशेष व्यवस्था केली. जोतिबा मंदिरातही त्यांनी मनोभावे दर्शन घेत भाविकांशी संवाद साधला.
ग्रुप बुकिंगवर भरघोस सवलत
नव्या वर्षातील सर्वात मोठा सांगितिक सोहळा आज होत असताना आयोजकांनी रसिकांसाठी खास ऑफर जारी केली. सैनिक, माजी सैनिक, शिक्षक, शासकीय सेवक, पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांना तिकिटावर बंपर सवलत देण्यात येणार आहे. महिलांनाही ग्रुप बुकिंगवर आकर्षक ऑफर आहे. रविवारी देखील बुकिंग सुरू असून ग्रुप बुकिंग करणार्यांना भरघोस सवलत देण्यात येणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने (महासैनिक दरबार बॉक्स ऑफिस) रसिकांना बुकिंग करता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क : 7517513377, 8390876037.