जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरशीची लढत होऊन शिवसेनेचे अनंत (बाळा) नर यांनी 1522 मतांनी विजय मिळवला. त्यांनी मिंधे गटाच्या उमेदवार मनीषा रवींद्र वायकर यांचा दारुण पराभव केला. मिंधे गटाने मते फोडण्यासाठी धनशक्तीचा वापर केला होता. त्या धनशक्तीला महाविकास आघाडीच्या एकीचे बळ आणि निष्ठावान शिवसैनिकांनी अक्षरशः चिरडून टाकले. निवडणुकीत बाळा नर यांना 76,615 मते, तर मनीषा वायकर यांना 75,093 मते मिळाली.
जोगेश्वरी पूर्व हा शिवसेनेचा बालेकिल्ला. लोकसभा निवडणुकीत मिंधे गटाने ‘मॅनेज’ विजय मिळवला होता. त्यावेळी जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून मात्र शिवसेनेनेच मताधिक्य मिळवले होते. त्या पार्श्वभूमीवर येथील लढतीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. सुरुवातीच्या 18 फेऱ्यांपर्यंत मनीषा वायकर आघाडीवर होत्या. मात्र 13 व्या फेरीपासून त्यांच्या मतांमध्ये घसरण झाली. 19 व्या फेरीमध्ये चित्र पूर्णपणे पालटले आणि वायकर यांना मागे टाकत शिवसेनेच्या बाळा नर यांनी 2139 मतांची आघाडी मिळवली. 20 व्या फेरीत पुन्हा बाळा नर 1747 मतांनी आघाडीवर राहिले आणि 21 व्या निर्णायक फेरीत बाळा नर 1522 मतांचे मताधिक्य मिळवून विजयी झाले.
शिवसैनिकांकडून जल्लोष
बाळा नर विजयी झाल्याचे वृत्त समजताच शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस व इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष साजरा केला. बाळा नर हे मतमोजणी केंद्राबाहेर येताच गुलाल उधळत, ढोल-ताशे वाजवत, पुष्पगुच्छ देत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
निवडणूक निकालावर मनीषा वायकर यांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. मिंधे गटाने लेखी अर्ज करीत फेरमतमोजणीची मागणी केली. तथापि, मतमोजणी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडल्याचे स्पष्ट करीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मिंधे गटाची मागणी धुडकावली.
वायकर यांच्या कार्यकर्त्यांना केंद्राच्या गेटवरच रोखले
मतमोजणी पार पडल्यानंतर काही वेळाने मनीषा वायकर यांच्या काही कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यात महिलांचाही समावेश होता. त्यांना नियमबाह्य पद्धतीने प्रवेश देण्यावर शिवसैनिकांनी जोरदार आक्षेप घेतला आणि मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांना गेटवरच रोखण्यास पोलिसांना भाग पाडले.
निष्ठावान शिवसैनिकांमुळे विजयी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मार्गदर्शन तसेच निष्ठावान शिवसैनिक व महाविकास आघाडीने खंबीर साथ दिल्यामुळे मी विजयी झालो, अशी कृतज्ञता बाळा नर यांनी व्यक्त केली.
लोकसभेतील पराभवाचा सूड घेतला
लोकसभेत शिवसेनेचा 48 मतांनी पराभव झाला होता. त्या पराभवाचा जोगेश्वरीकर शिवसैनिकांनी सूड घेतला, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर यांनी दिली. त्यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर बाळा नर यांची गळाभेट घेऊ अभिनंदन केले.