Published on
:
23 Nov 2024, 11:40 pm
Updated on
:
23 Nov 2024, 11:40 pm
संगणकीय कामकाजाचे वाढते प्रमाण, स्मार्टफोनचा अतिवापर आणि एकंदरीत बदललेली जीवनशैली यामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर अनेक प्रकारचे प्रतिकूल परिणाम होत आहेत. त्यातून द़ृष्टिक्षीणता किंवा नेत्रक्षीणतेचा त्रास असणार्यांची संख्या वाढत आहे.
नेत्रक्षीण रुग्णांनी आरोग्यवर्धिनी नेत्ररक्षावटी आणि चंद्रप्रभा प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा चावून खाव्यात. महात्रैलघृत दोन चमचे सकाळी आणि सायंकाळी खावे. योगवाही त्रिफळाचूर्ण एक चमचा रात्री एक चमचा तूप मधाचे मिश्रणाबरोबर घेणे. योग्य नंबरचा चष्मा लावावा. तसेच शतावरीघृत दोन वेळा पोटात घेणे. शतधौतघृत कपाळ, कानशिले, तळपाय, तळहाताला चोळावे. गाईच्या दुधाचा नेत्रबस्ती, करावा. द्राक्षे आणि आवळ्याच्या ऋतूमध्ये ताजी द्राक्षे आणि आवळे जरूर खावे. काळ्या मनुका खाव्या. सकाळी एक चमचा रसायनचूर्ण घ्यावे. शतावरीकल्प किंवा च्यवनप्राश अनुक्रमे तीन किंवा दोन चमचे दोन वेळा घ्यावे, वर दूध प्यावे.
विशेष दक्षता अणि विहार : डोळ्यास कफापासून विशेष जपावे. कफकारक पदार्थ, गार हवा, वारे, यांचेपासून लांब राहावे. वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करावी. जागरण, रात्री वाहनातून प्रवास, उपास टाळावा. या गोष्टी तसेच फाजील जेवण यामुळे द़ृष्टीला धोक असतो.
पथ्य : दुध्याभोपळा, कारले, पडवळ, दोडका, गाईचे तूप, मूग, कोथिंबीर, मनुका, गाईचे दूध, शेवगा, सुरण यांनी युक्त असा आहार असावा. याखेरीज अंजीर, द्राक्षे, शेवग्याचा पाल्याची भाजी, चाकवत, मुळा, हातसडीचे तांदूळ, कडधान्ये यांचा आहारात समावेश असावा.
कुपथ्य : तिखट, आंबट, खारट, आंबवलेले पदार्थ, अति ऊन, समोरून येणारा वारा, गार हवा, अति वेगाच्या वाहनात प्रवास, अति आणि सूक्ष्म वाचन टाळावे.
योग आणि व्यायाम : दररोज 12 सूर्यनमस्कार घालावेत. तज्ज्ञांचे सल्ल्याने शीर्षासन करावे.
रुग्णालयीन उपचार : घरी पूर्ण विश्रांती मिळत नसल्यास, ‘बेड रेस्ट’ करिता प्रवेशित रुग्ण व्हावे. फाजील वाचन बंद करावे. साध्या पाण्याच्या चुळा भराव्या. टीव्ही सतत पाहू नये. झोपून किंवा वाहनांत प्रवासात वाचन करू नये.