दिंडोशी मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार सुनील प्रभू यांनी विजयाची शानदार हॅट्ट्रिक केली. त्यांनी मिंधे गटाच्या संजय निरुपम यांना 6,058 मतांनी पराभूत केले. सुनील प्रभू यांना 76,115 मते, तर संजय निरुपम यांना 70,057 मते मिळाली. प्रभू यांच्या विजयानंतर गोरेगाव, दिंडोशी, मालाड परिसरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आणि विजयाचा गुलाल उधळत जल्लोष केला.
मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी गेल्या दहा वर्षांत मतदारसंघात अनेक विकासकामे केल्यामुळे त्यांचा विजय अपेक्षित होता. या निवडणुकीत शिवसेना, मिंधे गट आणि मनसेसह एकूण 19 उमेदवार उभे होते. मिंधे गटाने आयात उमेदवार संजय निरुपम यांना उभे करून शिवसेनेला टक्कर देण्याचा अपयशी प्रयत्न केला. मतमोजणीच्या 21 फेऱ्यांमध्ये चुरशीची लढत झाली आणि अंतिमतः सुनील प्रभू हेच विजयी झाले. मतमोजणीच्या 21 फेरीअंती निवडणूक निर्णय अधिकारी दयालसिंग ठाकूर यांनी शिवसेनेच्या सुनील प्रभू यांना 6,058 मतांनी विजयी झाल्याचे घोषित केले.
फेरमतमोजणीतही मिंधे गट ठरला ‘फेल’
कुरार व्हिलेज येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये पारदर्शक पद्धतीने मतमोजणी झाली. मात्र निकालाने जबर धक्का दिल्याने अस्वस्थ झालेल्या मिंधे गटाने ‘रडीचा डाव’ खेळण्यास सुरुवात केली. निरुपम यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यानुसार फेरमतमोजणी करण्यात आली. त्यातही मिंधे गट ‘फेल’ ठरला आणि सुनील प्रभू यांच्याच विजयावर शिक्कामोर्तब झाले.
दिंडोशीकरांचे प्रेम तसेच शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतल्यामुळे तिसऱ्यांदा विधानसभेत जात आहे. सर्वांचे मनापासून आभार मानतो, अशी प्रतिक्रिया सुनील प्रभू यांनी दिली.