मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये द्यावेत असे आदेश न्यायालयानं आज दिले. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले धस?
मी अगोदरच सांगितलं होतं, करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, असं मी मला वाटतं एका बाईटमध्ये म्हटलं होतं, आणि आता त्या पलिकडे आम्हाला काही बोलायचं नाही. त्यांची पहिली असो, दुसरी असो यावर आता आम्हाला काही चर्चा करायची नाही. आमचा फोकस हा संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी आणि देशमुख यांना न्याय मिळावा यावर आहे. ती आमची फस्ट प्रायोरेटी आहे. आणि महादेव मुंडे ते बिचारं 38 वर्षाचं लेकरू त्याचे लेकरबाळ रडत आहेत. महादेव मुंडे यांचे देखील मारेकरी सापडले पाहिजेत, ही आमची प्रायोरेटी आहे. धनंजय मुंडेंची पहिली बायको, दुसरी बायको आणखी काय काय, ते आम्हाला बोलू नका अन् विचारू नका, असं धस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कोर्टानं हा निकाल दिल्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली होती. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, कौटुंबीक हिंसाचार करणारा मंत्री मंत्रिमंडळात चालतो का? याबाबत धस यांना विचारले असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. मी यावर प्रतिक्रियाच देणार नाही. मी जे बोलायचं ते बोललो. मला त्याचा फोकस दुसरीकडे जाऊच द्यायचा नाही, आमची प्रायरेटी काय आहे, 60 दिवस होऊ नाहीतर 61 दिवस होऊ आम्हाला आमचा संतोष ज्या पद्धतीने मारला, त्यांना न्याय मिळून देण्यावरच काम करायचं आहे. त्यावरच आता धनंजय देशमुख आणि आमची चर्चा झाली. आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुरेश धस यांची भेट घेतली, या भेटीनंतर ते बोलत होते.