Published on
:
24 Nov 2024, 12:33 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:33 am
सोलापूर : विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची. चौरंगी लढत असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सुरूंग लावत नवख्या भाजपच्या देवेंद्र कोठे यांनी बाजी मारत कमळ फुलवले आहे. तर एमआयएमची केवळ हवाच होती. मात्र मतदारांनी एमआयएमला साफ नाकारले. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है चा नारा दिल्यामुळे तसेच सरळ सरळ हिंदू विरूध्द मुस्लिम असेच चढोओढीने मतदान झाले होते. याठिकाणी एमआयएमची पतंग कटली असून भाजपचे कमळ फुलले आहे.
लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे खासदार झाल्या. मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी झाली. मुस्लिम समाज, मोची समाजाने आमच्या समाजाच्या उमेदवारास उमेदवारी देण्याची मागणी केली. शेवटी काँग्रेसने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे मुस्लिम समाज, मोची समाजात मोठी नाराजी पसरली होती. भाजपकडून नवखे देवेंद्र कोठे यांना संधी देण्यात आली. माकपचे उमेदवार नरसय्या आडम आणि एमआयएमकडून फारुख शाब्दींना संधी दिली होती. या मतदारसंघात शाब्दी आणि कोठे यांच्यातच लढत होईल, अशी चर्चा होती. 14 दिवस प्रचारात कोठेंनी एमआयएमवर सडकून टिका केली. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है चारा नारा दिला तर शाब्दींनी विकास कामे करू, रोजगार देवू अशा मुद्यावर प्रचार केला. मुस्लिमाबरोबर हिंदू, दलित, मराठा, पद्मशाली, मोची, लोधी यासह विविध समाजात जाऊन प्रचार केला. एकुण 21 उमेदवारात मतदान झाले. मागील निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत मताची टक्केवारी वाढली.
एकंदरीत, एमआयएमचे शाब्दी किंवा भाजपचे कोठे यांच्यापैकी एक विजयी होईल, अशीच चर्चा होती, मात्र ठामपणे कोण सांगत नव्हते. प्रत्यक्षात ईव्हीएमचा पेटारा उघडला. पोस्टल मतापासूनच कोठे यांनी आघाडी घेतली. त्यानंतर दुसर्या आणि चौथ्या फेरीत शाब्दींनी आघाडी घेतली. त्यानंतर 22 व्या फेरीपर्यंत कोठेंचा लीड वाढतच गेला. शाब्दींना मते मिळत गेली. अखेर 48 हजारांचे लीड घेवून देवेंद्र कोठे हे विजयी झाले. दुसरीकडे काँग्रेसचे चेतन नरोटे यांना 20 हजारांचा टप्पाही गाठता आला नाही. काँग्रेस तिसर्या क्रमांकावर राहिली. तीन वेळा आमदार असलेले माकपचे नरसय्या आडम हे पहिल्याच फेरीपासून पिछाडीवर होते. त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कोणतीही निवडणूक ही धर्माऐवजी विकासावर होणे अपेक्षित आहे.