अकोले विधानसभा मतदार संघातील पिंपळदरी परिसरात बोलेरो गाडीत पैशाने भरलेले खोके आल्याची अफवा उडाली अन् एफएसटी पथकाची तारांबळ उडाल्याचे दिसले. संबंधित पथकाने पेट्रोलिंग करत असताना महिंद्रा कंपनीच्या बोलेरो वाहनाचा पाठलाग करून अक्षरशः ट्रॅक्टर आडवा लावून ‘ती’ बोलेरो थांबवली. मात्र गाडीची तपासणी केली असता त्यात पैशांच्या खोक्याऐवजी देशी संत्रा दारूचे खोके मिळून आले.
पिंपळदरी गावच्या दिशेने पैसे भरलेली गाडी आली. पैसे वाटप होणार आहे. ती गाडी पकडा, ही एकच चर्चा व अफवा मोबाईल फोनद्वारे पसरली. गावागावांतील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचे फोन वाजू लागले. अन् सर्वच सतर्क झाले. पोलिस प्रशासन, विशेष पथक व निवडणूक अधिकारी यांना याबाबत माहिती देण्यात आली. पथकाने संंबंधित गाडीचा पाठलाग सुरू केला.अन् पिंपळदरी परिसरातील रस्त्यावर ट्रॅक्टर आडवा लावण्यात आला. त्यानंतर ती गाडी थांबविण्यात आली. बोलेरो क्रमांक एम एच 14 डी एक्स 8853 या गाडीची तपासणी केली असता गाडीत 57,120 रुपये किमतीचे देशी संत्रा कंपनीचे दारूचे 17 बॉक्स मिळून आले. या कारवाईत 6 लाख 50 हजार किमतीचे बोलेरो गाडीसह 7 लाख 7 हजार 120 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत एक दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूने भरलेली बोलेरो गाडी लहीत येथील एका अवैध दारू विक्रेत्याला माल पोहचविण्यासाठी जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणी राजूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक यांच्या फिर्यादीनुसार अक्षय मारुती वाकचौरे यांचेवरुद्ध अकोले पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो.हे.कॉ.किशोर तळपे करत आहे