लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे. त्यामुळे विरोधी पक्षात निवडून आलेल्या लोकांचा आम्ही सन्मान करू, त्यांचा आवाज छोटा असो की मोठा, ज्या योग्य गोष्टी असतील त्यावर योग्य प्रतिसाद देत विरोधी पक्षाला सोबत घेऊन काम करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. या विजयासाठी लाडक्या बहिणींचे विशेष आभार मानतो, असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाबाबत एकत्र बसून निर्णय
अमित शहांनी मुख्यमंत्रीपदाबाबत पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवतील. यासंदर्भात कोणताही वादविवाद नाही. पहिल्या दिवसापासून हे ठरलं आहे की, निकालानंतर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन हे ठरवतील. त्या बैठकीत जो काही निर्णय होईल तो आम्हा सर्वांना मान्य असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.