Published on
:
03 Feb 2025, 12:55 am
Updated on
:
03 Feb 2025, 12:55 am
सातारा : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस वाटपात सातार्याला ठेंगा दाखवला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील मंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. महामंडळाच्या सातारा विभागातील सुमारे 100 बसेस वर्षभरात भंगारात निघणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशी वाहतुकीचे तीन तेराच वाजणार आहेत.
राज्य सरकारच्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिला सन्मान योजनेमुळे महिला वर्गाला सवलतीच्या दरात एसटी प्रवास करणे शक्य झाले आहे. एसटी प्रवास खिशाला परवडणारा आणि सोयीस्कर झाल्याने गेल्या काही दिवसात एसटीची प्रवासी संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. महिला सन्मान योजनेची जसजशी महिलांना माहिती होत आहे. तशी महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. शासनाच्या विविध सवलतीमुळे सध्या एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. पंरतू जर्जर आणि खिळखिळ्या झालेल्या बस महामंडळाकडून लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातील विविध मार्गावर सोडण्यात येत आहेत. त्यामुळे या बसेस अर्ध्या वाटेत कुठेही बंद पडणे आणि नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.
महामंडळाच्या सर्वच विभागातील आगारामध्ये आधीच बसेसची कमतरता आहे. त्यात प्रवाशांना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा ओढा एसटीकडे वाढला आहे. परंतू या वाढलेल्या प्रवाशांचा भार सोसताना एसटीला दमछाक होत आहे. एसटी महामंडळाच्या एसटी बसेस नियमानुसार 12 लाख किमी धावलेली एसटी प्रवासी वाहतुकीमधून बंद केली जाते. मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवून एसटी बसेस सुसाट धावताना दिसत आहेत. एकीकडे प्रवाशांची सोय तर दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरीही नव्या बसेस उपलब्ध होत नसल्याने जुन्या बसद्वारेच प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचे चित्र सर्रास सर्वत्र पहावयास मिळत आहे.
सातारा विभागात सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव-खंडाळा, वडूज, दहिवडी, कोरेगाव, फलटण, मेढा ही 11 आगारे आहेत. या आगारामधील सुमारे 636 बसेस तसेच खाजगी 21 इलेक्ट्रिक बसेस लांब पल्ल्यासह ग्रामीण भागात धावत आहेत. त्यापैकी मार्च 2024 ते मार्च 2025 अखेर 100 बसेस नियत वयोमानानुसार भंगारात जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या दिमतीला कोणत्या बसेस द्यायच्या असा मोठा प्रश्न अधिकारी व कर्मचार्यांना पडला आहे. सध्या उन्हाळी हंगाम हा एसटीच्या उत्पन्नाचा हंगाम म्हणून ओळखला जातो. त्यासाठी सातारा विभागाला नवीन 200 बसेसची आवश्यकता आहे. नवीन बसेस मिळाल्या तर प्रत्येक आगाराला 15 ते 20 बसेस दिल्यास तेथील दैनंदिन गरज भागू शकणार आहे. मात्र नवीन बसेस मिळाव्यात यासाठी वरिष्ठ कार्यालयामार्फत महामंडळाकडे पाठपुरावा सुरु आहे. दुसरीकडे महामंडळाकडे नवीन सुमारे 200 हून अधिक डिझेल बसेस आल्या असून त्या राज्यातील विविध विभागांना दिल्या आहेत. त्यामुळे नवीन बस वाटपात सातार्याला महामंडळाने ठेंगा दाखवला असल्याने जिल्ह्यातील चारही मंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यांनी लक्ष घातले तरच सातार्याला नवीन बसेस मिळतील, अशी अपेक्षा जिल्ह्यातील प्रवाशी वर्गातून व्यक्त होत आहे.