बिबवेवाडीत सराइतांचे पूर्ववैमनस्यातून भयंकर कृत्य; 30 वाहनांची तोडफोडPudhari
Published on
:
06 Feb 2025, 5:28 am
Updated on
:
06 Feb 2025, 5:28 am
पुणे: खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि. 5) पहाटे अडीचच्या सुमारास सराईत गुन्हेगारांनी बिबवेवाडीतील अपर इंदिरानगर, दुर्गामाता गार्डन, राजीव गांधीनगर परिसरातील 25 ते 30 वाहनांची कोयत्याने तोडफोड केली.
पूर्ववैमनस्यातून ही वाहने फोडल्याचे सांगितले जात असले, तरी दहशत निर्माण करण्यासाठी वाहने फोडल्याची माहिती आहे. त्यामुळे गुन्हेगारांची दहशत कायम असल्याचे दिसून येत असून, वाहन तोडफोडीचे हे सत्र थांबणार तरी कधी? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य नागरिकांची वाहने फोडल्यामुळे त्यांच्याकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिषेक पांढरे आणि गणराज सुनील ठाकर या दोघांना वेल्हा तालुक्यातील पाबे घाटातून अटक केली. तर एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.
यातील ठाकर आणि देवकर हे दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. ठाकर याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार 2021 मध्ये स्थानबद्धतेची कारवाई केली होती, तर 2022 मध्ये तो बाहेर आला आहे. पर्वती, जनता वसाहत आणि बिबवेवाडी परिसरात वारंवार वाहनांवर दगडफेकीचे प्रकार होत असतात.
बुधवारी पहाटे ज्या ठिकाणी वाहनांवर दगडफेक करण्यात आली. त्याच भागात सहा महिन्यांपूर्वी वाहनांवर दगडफेक करून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील अपर इंदिरानगर परिसरात पहाटे पावणेतीनच्या सुमारास तिघांनी रस्त्यावर पार्क केलेल्या टेम्पो, कार, रिक्षा, दुचाकी यांच्यावर कोयत्याने सपासप वार करून त्यांच्या काचा फोडल्या.
एकापाठोपाठ एक वाहनांच्या काचा फोडत ते पुढे जात होते. येथील एका कारवर या टोळक्याने कोयते मारून तिच्या काचा फोडल्या. या कारच्या काचा फोडल्या जाण्याची ही तिसरी वेळ असल्याचे एका महिलेने सांगितले. दरम्यान, तोडफोडीच्या आवाजाने नागरिक जागे झाले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. मात्र, तोपर्यंत हे टोळके पळून गेले होते.
पोलिसांनी त्यांचा माग काढत आरोपींना वेल्हा तालुक्यातील पाबे परिसरातून ताब्यात घेत अटक केली. तीन आरोपींची परिसरातून गुडघ्यावर बसवून धिंड देखील काढली. मात्र, असे असले तरी सर्वसामान्यांचे वारंवार अशा गुंडांकडून केले जाणारे नुकसान आणि दहशतीमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
उपनगरात तोडफोडीच्या वाढत्या घटना
उपनगरात दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. येरवडा, वारजे, पर्वती भागात तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. उपनगरातील वाढती गुन्हेगारी तसेच वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिक दहशतीखाली आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुंड टोळ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले. वाहन तोडफोडीच्या घटना रोखण्यासाठी कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर शहरात तोडफोडीचे प्रकार सुरू आहेत.
शहरात पोलिसांचे ‘वरातीमागून घोडे’
एकीकडे शहरात गंभीर गुन्हे कमी झाल्याचे पोलिस सांगतात. मात्र, दुसरीकडे रस्त्यावरील गुन्हेगारी चांगलीच डोके वर काढत असल्याचे दिसून येते. सराइतांकडून कधी वाहने फोडली जातात, तर कारागृहातून बाहेर आलेला गुन्हेगार रॅली काढतो. पोलिस सांगतात की, आमची प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. मात्र, सराइतांची मागील काही दिवसांतील गुन्हेगारी कृत्ये पाहता पोलिसांचा दावा पोकळ असल्याचे दिसून येते. त्यामुळे ‘दहशतगुन्हेगारांची अन् पोलिसांचे वरातीमागून घोडे’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
साहेब, कधी करणार ठोस उपाययोजना?
सर्वसामान्य नागरिकांची वाहने टोळक्याकडून टार्गेट केली जातात. अनेकांच्या वाहनांचा विमा नसतो. त्यामुळे वाहन फुटल्यानंतर आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यांचा काही दोष नसताना त्यांना अशा गुंडप्रवृत्तीचा वारंवार त्रास सहन करावा लागत आहे. जेथे खर्या अर्थाने पोलिसांची दहशत असायला हवी, तेथे गुन्हेगारच भाव खाऊन जात आपली दहशत निर्माण करत आहेत. पोलिसांबरोबर स्थानिक राजकीय नेत्यांनी यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.