‘मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार’ डॉ. मोहित कुमार जॉली यांना जाहीर. Pudhari File Photo
Published on
:
16 Nov 2024, 11:36 pm
Updated on
:
16 Nov 2024, 11:36 pm
पणजी : माजी संरक्षण मंत्री व गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा यंदाचा ‘मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार’ डॉ. मोहित कुमार जॉली यांना जाहीर झाला आहे. या प्रतिष्ठित पुरस्काराचे हे द्वितीय वर्ष आहे.
डॉ. मोहित कुमार जॉली हे बंगळूरू येथे कर्करोगाच्या उपचारांवर संशोधन करतात. हा पुरस्कार देशातील सर्वात युवा संशोधकाला दिला जातो. त्यासाठी देशातील सर्वोच्च संशोधन संस्थांकडून अर्ज मागवले जातात. यंदा 82 अर्जदार होते. त्यांच्यातील 12 जणांनी वैयक्तिक मुलाखती दिल्या, तर इतरांनी ऑनलाईन मुलाखती दिल्या. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ समितीने या मुलाखती घेतल्या व त्यातून एकाची निवड केली. तरुण वैज्ञानिक मनाला प्रेरणा देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारामध्ये 5 लाख रुपये मानधन दिले जाते. हा पुरस्कार सध्या देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सर्वोच्च रोख पारितोषिक आहे. 13 डिसेंबर 2024 रोजी एनआयओ दोनापावला येथे मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.