मतदारांनी महायुतीच्या पारड्यात मतांचे भरभरून दान दिले आहे. Pudhari Photo
Published on
:
23 Nov 2024, 11:41 pm
Updated on
:
23 Nov 2024, 11:41 pm
छत्रपती संभाजीनगर : सर्व ‘नरेटिव्ह’ खोटे ठरवत मराठवाड्यातील मतदारांनी महायुतीच्या पारड्यात मतांचे भरभरून दान दिले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांच्या 41 उमेदवारांना मतदारांनी विधानसभेवर पाठविले असून, अवघ्या 4 जागा महाविकास आघाडीला दिल्या आहेत. मनोज जरांगे फॅक्टर या निवडणुकीत सपशेल फेल ठरला.
‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’ अशा घोषणांसह निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या महायुतीने नियोजनबद्ध प्रचार, योग्य उमेदवारांना संधी आणि सकारात्मक मुद्दे मांडल्यामुळे महायुतीला हे यश मिळाले. मागील निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला 16, तर शिवसेनेला 12 जागा मिळाल्या होत्या. त्या निवडणुकीत उभय पक्षांची युती होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी 8 आणि इतरांना 2 जागा मिळाल्या होत्या. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी एकत्र निवडणूक लढविली. त्यांना 9 जागा मिळाल्या. यावेळी महायुतीला 35 म्हणजे गेल्यावेळेपेक्षा सात जागा जास्त मिळाल्या. हिंदुत्ववादी विचारांचीच पाठराखण मराठवाड्याने पुन्हा एकदा केली.
शिवसेना दुभंगली त्यावेळी आमचे वडील चोरले, आमचे चिन्ह आणि झेंडा चोरला, अशी ओरड ठाकरे गटाने केली होती. शरद पवार यांनीही फुटीर गटाला गद्दार म्हणून हिणवले होते. मतदारांनी मात्र खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आणि खरी राष्ट्रवादी अजित पवार यांचीच आहे, असा कौल दिला. वास्तविक, पक्षफुटीनंतर अनेक मतदारसंघांमध्ये तुल्यबळ उमेदवार उभे करण्याबाबत महाविकास आघाडीतील पक्षांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. दुसर्या किंवा तिसर्या फळीतील उमेदवारांना उमेदवारी द्यावी लागली. अनेकांना तयारी नसताना निवडणुकीच्या आखाड्यात उडी घ्यावी लागली. त्याचे परिणाम दिसून आले.
माजी केेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे आणि कन्या संजना जाधव यांनी अनुक्रमे भोकरदन आणि कन्नड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवले. संजना जाधव यांनी आपले पती हर्षवर्धन जाधव यांना हरवले.
एक भाऊ जिंकला, एक भाऊ हरला
माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र काँगे्रसचे अमित देशमुख यांनी लातूर शहरमधून विजय मिळवला, तर त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून पराभवाचा झटका बसला.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (परळी), शिवसेना
शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (सिल्लोड), संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम), संजय बनसोडे (उदगीर), भाजपचे अतुल सावे (औरंगाबाद पूर्व), खासदार अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण (भोकर), भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे (भोकरदन), कन्या संजना जाधव (कन्नड), काँगे्रसचे अमित देशमुख (लातूर शहर)
काँगे्रस नेते धीरज देशमुख (लातूर ग्रामीण), एमआयएमचे इम्तियाज जलिल (औरंगाबाद पूर्व), राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेश टोपे (घनसावंगी), जयप्रकाश दांडेगावकर (वसमत), काँगे्रसच्या मिनल खतगावकर (नायगाव), भाजपच्या अर्चना पाटील चाकूरकर (लातूर शहर), शिवसेना शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले (उमरगा).