महाराष्ट्राचे पहिले CM वीर नरिमन होणार होते:पण गुजराती लॉबीने विरोध केला, सरदार पटेलांनी रोखले - लेखक विश्वास पाटील

2 days ago 1
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री वीर नरिमन होणार होते, पण तेव्हाच्या गुजराती लॉबीने प्रचंड विरोध केला. त्यामुळे त्यांची ही संधी हुकली, असा दावा सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी केला आहे. बॅरिस्टर नरिमन हे सुभाषचंद्र बोसांचे जिवश्च-कंठश्च मित्र होते. मुंबईतले नरिमन पॉइंट आज त्यांच्यामुळेच अजरामर आहे. मुख्यमंत्री महायुतीचा होणार की महाविकास आघाडीचा, सत्तेत कोण येणार, याची उत्सुकता आहे. त्यातच विश्वास पाटील यांनी एक सविस्तर पोस्ट लिहून महाराष्ट्राचा राजकीय इतिहासाला उजाळा दिला. राजकीय वादंगाचा डाग विश्वास पाटील म्हणतात की, खरे तर मुंबई प्रांतिक राज्याच्या 1937च्या पहिल्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बॅरिस्टर खुर्शीद नरिमन होणार हे जवळजवळ नक्की झाले होते, पण या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाला पहिल्यापासूनच राजकीय वादंगाचा आणि वादळाचा जणू डाग लागलेला आहे. मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होण्यापासून बॅरिस्टर नरिमन यांना सरदार पटेल यांनी रोखले. सरदार तेव्हा केंद्रीय काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाचे चेअरमन होते. या निवडणुकीमध्ये बॅरिस्टर के. एफ. नरिमन हे तुफान मतांनी निवडून आले होते. त्यांची मुख्यमंत्री व्हायची खूप इच्छा होती. त्या आधी त्यांनी 1935 आणि 36 मध्ये मुंबईचे लोकप्रिय महापौर म्हणून उत्तम काम केले होते. फाजील अतिरेकाला विरोध विश्वास पाटील म्हणतात की, बॅरिस्टर नरिमन हे गांधीवादी होते. परंतु गांधीजींच्या अहिसेंच्या फाजील अतिरेकाला त्यांचा विरोध असायचा. त्या आधी नरिमन हे जवळपास 30 वर्ष कायदेमंडळाचे सदस्य म्हणून निवडून येत होते. त्यांनी पंडित नेहरू आणि सुभाष बाबू यांच्यासोबत काँग्रेसच्या यूथ लीगमध्ये काम केले होते. अतिशय गाजलेले एक निष्णात फौजदारी वकील आणि उच्च कोटीचे व धारदार भाषण करणारे एक फर्डे वक्ते म्हणून त्यांची मोठी ख्याती होती. बॅरिस्टर विठ्ठलभाई यांना सुभाषचंद्र बोस खूप आवडायचे. तर त्यांचे धाकटे बंधू सरदार पटेल यांच्यासाठी गांधीजी म्हणजे जीव की प्राण असायचे. एकूणच खुर्शीद नरिमन यांचा अनेक मुद्द्यावर गांधीजींना असणारा विरोध आणि सुभाषबाबूंशी असलेली त्यांची मैत्री व इतर काही तात्कालिक छोटे-मोठे वाद त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आड आले. भ्रष्टाचाराची लक्तरे काढली विश्वास पाटील म्हणतात की, सरदार पटेल यांनी विरोध केल्यामुळे त्यांचे महाराष्ट्राचा म्हणजेच मुंबई प्रांताचा पहिला मुख्यमंत्री होण्याचां योग जुळून आला नाही. त्यांच्या ऐवजी सरदार पटेल यांनी रत्नागिरीपुत्र बाळासाहेब गंगाधर तथा बी. जी. खेर यांना मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बनवले. त्या वेळेच्या रिवाजानुसार या पदाला पंतप्रधान असे म्हटले जायचे. तेव्हाच्या मुंबई प्रांताची हद्द ही आताच्या हुबळी-बेळगाव पासून ते पुणे, नगर आणि नाशिक पर्यंतच्या दख्खन, समुद्राकाठचे कोकण, आजचा संपूर्ण गुजरात प्रांत (संस्थानी विभाग सोडून) व आजच्या पाकिस्तानातील सिंधप्रांता पर्यंत मुंबई राज्याची विराट अशी हद्द होती. त्या आधी बॉम्बे रिक्लेमेशन केसमध्ये हार्वे नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याचे नरिमन यांनी विधिमंडळात व विधिमंडळाबाहेर अक्षरशः वाभाडे काढले होते. गोऱ्या ब्रिटिश साहेबाकडून बांधकाम खात्यात झालेल्या काळ्या भ्रष्टाचाराची अक्षरशः लक्तरे काढली होती. त्यामुळे चिडलेल्या हार्वे साहेबाने नरिमन यांच्याविरुद्ध हायकोर्टामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. तो दावा सुद्धा खूप गाजला होता. कलामांच्या पुस्तकात उल्लेख विश्वास पाटील म्हणतात की, ब्रिटिश जजने हार्वे यांच्या विरुद्धचे आरोप पुरेशा कागदपत्र अभावी सिद्ध होऊ शकत नाहीत असा निकाल दिला. पण बॅरिस्टर नरिमन यांना त्याबाबत दोषी धरायचे धाडस त्या न्यायाधीशाला झाले नाही. बॅरिस्टर नरिमन यांनी जनहितासाठी जो काही खटाटोप केला होता, त्याच्या पाठीमागची त्यांची जी तळमळ होती. त्याबाबत नरिमन यांचे न्यायमूर्तींनी कौतुकच केले. त्यामुळे नरिमन मुंबईत अक्षरश जननायक बनले. लोक त्यांना गर्वाने 'वीर नरिमन' म्हणून बोलावू लागले. तसेच जनतेने मंत्रालयाच्या त्या परिसराला 'नरिमन पॉइंट' असे नाव देऊन त्यांचा यथोचित सन्मानच केला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी बॅरिस्टर नरिमन यांच्यावर केलेला अन्याय अनेकांना पटला नव्हता. भारताचे राष्ट्रपती अबुल कलाम आझाद यांनी लिहिलेल्या आपल्या 'इंडिया विंस फ्रीडम' या आत्मचरित्रात अगदी आरंभीच याबाबत सरदार पटेल यांच्यावर खूप कठोर शब्दात टीका केलेली आहे. तसेच पारशी समाजातून आलेल्या, देशासाठी अनेक वेळा तुरुंगवास भोगलेल्या नरिमन यांच्या सारख्या देशभक्तावर जो अन्याय झाला, त्याबाबत खूप हळूहळू आणि खेदही व्यक्त केला आहे. अमरत्वाच्या विटेवर बसवले विश्वास पाटील म्हणतात की, एक निष्णात फौजदारी वकील म्हणून नरिमन यांना त्या काळात अक्षरशः लाखो रुपये मिळायचे. बॅरिस्टर नरिमन यांचे महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न पूर्ण झाले नाही, पण ज्या परिसरामध्ये मंत्रालय आहे त्या भूभागाचे नाव स्वाभिमानी व देशप्रेमी मुंबईकरांनी ‘नरिमन पॉइंट' असे ठेवून नरिमन साहेबांना कायमस्वरूपी अमरत्वाच्या विटेवर बसविले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनातील कारकीर्द दाखवणाऱ्या तक्त्यावर या पुढेही अनेक जणांची नावे मुख्यमंत्री म्हणून लिहिली जातील . नवा वारसदार आल्यावर ती पाठीमागे पडून नवीन नावे लिहिली जातील. पण काळाच्या काळजावर देशभक्त नरिमन यांचे गोंदलेले नरिमन पॉइंट हे नाव चिरकाल राहणार आहे. या निमित्ताने मुंबई महानगराचा गौरवशाली पाया घालणाऱ्या कर्तबगार पुरुषांपैकी एक मुंबईकरांचा लाडका पुत्र या नात्याने मला बॅरिस्टर वीर नरिमन यांचे स्मरण होते, त्यांना माझा मानाचा मुजरा.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article