Published on
:
03 Feb 2025, 1:00 am
Updated on
:
03 Feb 2025, 1:00 am
रत्नागिरी : जान्हवी पाटील
कोरोना काळात दोन वर्षे लॉकडऊन झाले आणि पुस्तक हातात घेणार्या विद्यार्थ्यांच्या हातात अॅन्ड्राईव्ह मोबाईल हातात आला. खरी समीकरणे इथेच बदलली. या अॅन्ड्राईड मोबाईलने विद्यार्थ्यांचे बालपण हिरावून घेतले. मातीतील बोटे आता मोबाईलच्या कि -पॅडवर रिंगाळू लागली आहेत. वाढत्या मोबाईलच्या वापरामुळे विद्यार्थी-पालक आणि शिक्षक संवादही दुरावतोय, परिणामी कमी वयात नको त्या वाईट गोष्टींना बळी पडणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे.
सोशल मीडियाचा जितका चांगला वापर होतो तितकाच त्याचा वाईट परिणामही होत आहेत. केवळ त्याचा अतिवापर केला जात आहे. याच सोशल मिडियाच्या चांगला वापर करुन अनेकांनी अशक्य गोष्टी शक्य करुन यश मिळवले आहे. मात्र सध्या शालेय मुलांचे मन मोबाईलच्या फार विचलित होत आहे.
अभ्यासापलीकडे शालेय विद्यार्थी मोबाईलचा वापर करु लागले आहेत. वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी त्यांच्या वागण्यात तरुण मुलांप्रमाणे बदल होत आहेत. मोबाईलच्या माध्यमातून मुली मुलांचा संपर्क वाढत आहे. सोशल मिडियावर अर्थात फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर बहुतांश शालेय मुला मुलींचे अकाउंट आहेत. यामध्ये फोटो, रिल्स शेअर केल्या जात आहे. यातूनच फसव्या गोष्टीला बळी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: सोशल मिडियाच्या माध्यमातून मुलींचे मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे, याचा गांभिर्याने पालकांनी विचार करणे आवश्यक आहे.
या इंटरनेटच्या युगात क्षणिक सुखासाठी विद्यार्थी कोणत्याही थराला जातात यातून गुन्हे घडत असल्याची माहिती पोलीस विभागाकडून पुढे आली आहे. इतकेच नव्हे तर शिक्षक आणि विद्यार्थिनी यांच्या पवित्र नात्याला थोडीसी असुरक्षिततेची किनार लागत आहे. शिक्षकांनी विद्यार्थिनींचा विनयभंग, लैगिंक अत्याचार केल्याच्या 2 ते 3 घटना रत्नागिरीत घडल्या आहेतच. मात्र, सगळीकडेच अशा घटना घडताना दिसून येत आहे. काही मोजक्या शिक्षकांच्या या गैरवर्तनाने अशा घटना घडल्या आहेत.
अभ्यासासाठी पालकांनी मोबाईल न दिल्याने शालेय वयात आत्महत्या केल्याच्या घटना मोठ्या शहरात या दोन वर्षात अधिक समोर आल्या आहेत. मुलांना विश्वासात घेवून त्यांना समजावून सांगण्याची वेळ पालकांवर आली आहे. मुलांनी एखादी गोष्ट मागितल्यावर त्यांच्या मागण्या पालकांनी त्वरीत पूर्ण करु नये. यामुळे मुलांना नकार पचवण्याची सवय लागेल मात्र अलीकडे पालक प्रत्येक गोष्ट मुलांना आणून देतात, त्यांच्या मोबाईल वापराकडे लक्ष देत नाही या सगळ्या गोष्टींमुळे मुलांमधील संवेदना लहानपणीच हरवत चालली आहे. यासाठी वेळीच या सर्व गोष्टींना आळा कसा घालता येईल याचा विचार सगळ्यांनी करण्याची गरज आहे.
मोबाईलच्या अतिवापराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून मुलांवर पालकांचे नियंत्रण दिसून येत नाही. या सोशल मीडियाच्या वापरातून लैंगिक अत्याचारासारख्या घटना वाढू लागल्या आहेत ही चिंताजनक बाब आहे. त्याचबरोबर यातुन गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय वाढ होत आहे.
धनंजय कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, रत्नागिरी