मिरज, कोल्हापूरसाठी ना भरीव निधी, ना नवी रेल्वे!File Photo
Published on
:
02 Feb 2025, 12:30 am
Updated on
:
02 Feb 2025, 12:30 am
मिरज ः रेल्वे अर्थसंकल्पात देशभरातील नवीन रेल्वे मार्गांसाठी भरीव निधींची तरतूद केली आहे. परंतु,पुणे-मिरज-लोंढा या रेल्वे मार्गाव्यतिरिक्त सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील नव्या रेल्वेमार्गाला भरीव निधी दिलेला नाही. त्यामुळे कोल्हापूर ते वैभववाडी, कराड ते चिपळूण आणि हातकणंगले ते इचलकरंजी हा रेल्वेमार्ग पुन्हा लांबणीवर पडणार आहे. राजेवाडी ते पुरंदर या नव्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे.
पश्चिम महाराष्ट्र कोकणशी जोडण्यासाठी कोल्हापूर ते वैभववाडी आणि कराड ते चिपळूण या मंजूर असणार्या रेल्वेमार्गांसाठी भरीव अशी तरतूद करणे अपेक्षित होते. परंतु, तसे झालेले नाही. या रेल्वेमार्गांचे सर्वेक्षण होऊन सुमारे पाच वर्षे लोटली तरी केवळ टोकन अमाऊंटचीच तरतूद केली आहे. यावर्षीच्या अंदाजपत्रकात या रेल्वेमार्गासाठी भरीव अशी निधीची तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील रेल्वे प्रवाशांना या नव्या रेल्वेमार्गांसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
पुणे-मिरज-लोंढा या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचा अंतिम टप्पा सुरू आहे. त्यामुळे या कामासाठी रेल्वे अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद केली आहे. परंतु, असे असले तरी मिरज आणि कोल्हापूरमधून नव्या रेल्वे गाड्या सुरू करण्याची प्रवासी संघटनांची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे.