सावंतवाडी ः पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याशी चर्चा करताना देव्या सूर्याजी, रवी जाधव व जखमींचे नातेवाईक अन्य.pudhari photo
Published on
:
03 Feb 2025, 12:55 am
Updated on
:
03 Feb 2025, 12:55 am
सावंतवाडी ः रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने ग्रीट मारल्याने दुचाकी स्वार घसरून अपघात होत आहेत. ठेकेदार व प्रशासनाच्या चुकीच्या कामाचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा, अशी मागणी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडे शहरातील नागरिक व जखमींच्या नातेवाईकांनी केली.
सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी रस्त्याची कामे करण्यात आली. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ग्रिट टाकण्यात आली आहे, त्यामुळे रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले असून रस्त्यांवरून दुचाकी वाहने स्लीप होत आहेत. अशाच प्रकारे दुचाकी अचानक स्लीप झाल्याने मंगळवारी एका परिचारिकेला अपघाताला सामोरे जावे लागले, ज्यात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या चुकीच्या कामामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर वारंवार अपघात होत असून यामुळे नागरिक व वाहन चालकांमधून तीव्र असंतोष पसरला आहे.
न. प. प्रशासक हेमंत निकम व मुख्याधिकारी सागर साळुंखे हे ठेकेदाराला पाठिशी घालत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. या चुकीच्या पद्धतीने केलेल्या रस्ता कामांचा नाहक मनस्ताप शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. याप्रकरणी प्रशासक, मुख्याधिकार्यांसह ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी पोलिस निरीक्षकांकडे केली.
शहरात काही महिन्यांपूर्वी नव्याने केलेले रस्ते बोगस कामामुळे खराब झाले. या विरोधात जनक्षोभ उसळल्यानंतर ठेकेदाराने पुन्हा दुरुस्ती केली. यावेळी चुकीच्या पद्धतीने काम करत डांबरापेक्षा ग्रीट अधिक मारली गेली. यामुळे हवा प्रदूषणासह अपघातांना आमंत्रण मिळत आहे. दोन दिवसांत तब्बल नऊ अपघात झाले असून यात गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले गेले. यामुळे आक्रमक झालेल्या शहरवासीयांनी अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांसह पोलिस ठाणे गाठले. मनुष्यहानीला कारणीभूत ठेकेदारासह प्रशासकांवर मनुष्यहानीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली.
युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, अपघातग्रस्त तथा उद्योजक सिद्धांत परब, प्रथमेश प्रभू ,संदीप निवळे आदी उपस्थित होते. , नव्या गतिरोधकांवर पट्टे मारावे व निर्देशक फलक बसवावे असे रवी जाधव यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी रस्त्यावरील ग्रीटसंदर्भात मुख्याधिकारी सागर साळुंखे यांचे लक्ष वेधले.