Published on
:
23 Nov 2024, 11:46 pm
Updated on
:
23 Nov 2024, 11:46 pm
नागपूर : विदर्भात शनिवारी लागलेल्या निकालाने कधीकाळी काँग्रेसचा गड असलेला विदर्भ आता पुरता भाजपच्या ताब्यात गेल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. 53 जागांवर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुती, तर 9 जागी महाविकास आघाडी वृत्त लिहीपर्यंत आघाडीवर आहे. 2014 मधील मोदी लाटेपेक्षाही मोठे यश भाजप महायुतीने मिळविले असून काँग्रेस महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांचा दारुण पराभव झाला आहे.
भाजपला लाडक्या बहिणींची मोठी साथ भाजपसाठी गेमचेंजर ठरली असून सावत्र भाऊ सत्तेत आल्यास या योजना बंद पडतील, हे पोहोचविण्यात काँग्रेसच्या 3000 रुपये आम्ही देऊ या अमिषापेक्षा भाजप यशस्वी ठरली. महागाई, शेतकर्यांची नाराजी, बेरोजगारी असे ज्वलंत विषय असूनही काँग्रेस एकसंधपणे याचा मुकाबला करू शकली नाही. या लाटेतही अनेक उमेदवारांनी शेवटच्या फेरीपर्यंत भाजपला कडवी झुंज दिली आहे.
भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (दक्षिण पश्चिम नागपूर), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (साकोली), विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (ब्रह्मपुरी), काँगे्रस नेते विकास ठाकरे (पश्चिम नागपूर), काँगे्रसचे नेते माजी मंत्री नितीन राऊत (उत्तर नागपूर), भाजपचे कृष्णा खोपडे (पूर्व नागपूर)
काँगे्रस नेत्या यशोमती ठाकूर (तिवसा), प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू (अचलपूर), काँगे्रस नेते माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार (सावनेर), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सलील देशमुख (काटोल), काँगे्रस नेते माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक (रामटेक).
नाना पटोले हरता हरता 152 मतांनी जिंकले
साकोली विधानसभा मतदारसंघात काँगेे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मतमोजणीत पिछाडीवर होते. पण त्यांनी प्रतिस्पधीं भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचे मताधिक्य कापत 152 मतांनी निसटता विजय मिळवला.
विदर्भातील महायुतीच्या विजयाची वैशिष्ट्ये
2014 च्या मोदी लाटेपेक्षा यंदा मोठे यश
लाडकी बहीण योजना गेमचेंजर
62 पैकी 36 जागांवर काँगे्रसशी थेट लढतीत भाजपची बाजी
पूर्व विदर्भात महाविकास आघाडीला केवळ 3 जागा
भाजप, राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना शिंदे गट यांच्यातील जागा वाटप महत्त्वाचे ठरले.
मतविभाजन टाळण्यात महायुतीला यश