सातारा : व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश हे प्रवेश परीक्षांमधील गुणवत्तेवर आधारित होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांवर बोर्ड परीक्षा व सीईटी अशा दोन्ही परीक्षांचा ताण वाढतो. मात्र या वर्षीपासून सीईटी सेलच्यावतीने सुमारे 19 व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेच्या सरावासाठी मॉक टेस्ट उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे यावर्षीपासून विद्यार्थ्यांना सीईटीचे टेन्शन कमी होणार आहे.
राज्य सामाई प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, कृषी, कृषी अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, विधी, बीबीए, बीसीएस, बीसीए, एमबीए, एमएड., बीपीएड यांसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. सर्वच व्यवसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय स्तरावर राबवण्यात येते. त्यामुळे प्रवेश परीक्षेत गुणवत्ता सिध्द करावी लागते. त्याचबरोबर बोर्ड परीक्षेतही ठराविक गुणांचे निकष पूर्ण करणे आवश्यक असल्याने बोर्ड परीक्षा व सीईटी या दोन्ही परीक्षांच्या अभ्यासाचा समन्वय साधणे कठीण जाते. विद्यार्थ्यांचा हाच ताण कमी करण्यासाठी सीईटी सेलने पहिल्यांदाच अधिकृत संकेतस्थाळावर मॉक टेस्ट उपलब्ध केल्या आहेत. विद्यार्थी अधिक माहितीसाठी https://cetcell.mahacet.org, https://mocktest.mahacet.org/StaticPages/HomePage या संकेत स्थळाला भेट देवून आवश्यक माहिती मिळवू शकतात. दरम्यान, या मॉक टेस्ट सोडवल्याने सीईटीच्या परीक्षेचे स्वरुप समजणार असून सरावही होणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
‘सीईटी अटल’वर विनामूल्य नोंदणी...
सीईटी मॉक टेस्ट घेण्यासाठी सीईटी अटल या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असून ती विनामूल्य आहे. अभ्यासक्रम निवडून पाच पेपरचा एक संच विद्यार्थी घेवू शकतात. मात्र त्यासाठी शुल्क आकारले जाणार असून पहिला पेपर सोडवल्यानंतर दुसरा पेपर सोडवण्यासाठी आठ दिवसांचे अंतर असेल. एका विद्यार्थ्याला एका वेेळी अनेक अभ्यासक्रमांच्या मॉक टेस्ट देता येणार आहेत