Published on
:
22 Nov 2024, 2:31 am
Updated on
:
22 Nov 2024, 2:31 am
मुंबई : Maharashtra Assembly Polls | राज्यात विधानसभा निवडणूक निकालाला अवघे काही तास बाकी असतानाच सत्तारूढ महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीकडून राज्यात आपल्या आघाडीचीच सत्ता येईल, असा दावा करण्यात आला. दोन्हीकडून भेटीगाठी, खलबते व बैठकांचा सपाटा सुरू आहे. दुसरीकडे, दोन्ही आघाड्यांच्या प्रमुख नेत्यांनी राज्यभरात निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या बंडखोर उमेदवारांसह अपक्षांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
सत्तास्थापनेच्या शर्यतीत काही जागा कमी पडल्या तर या उमेदवारांच्या मदतीने सत्ताशिखर गाठणे, अशी त्यामागील भूमिका आहे. विशेष म्हणजे, निवडणूक निकालानंतर आपापल्या आमदारांची व्यवस्था करण्यासाठी महायुती आणि 'मविआ'ने हॉटेल्सचे बुकिंगही आधीच करून टाकले आहे. निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या 'एक्झिट पोल 'मध्ये राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तथापि, महाविकास आघाडीने त्याकडे फारसे लक्ष न देता आपल्या पातळीवर बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी गोळाबेरीज सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवारांसोबत जाण्यासंबंधीचे संकेत दिल्यामुळे सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सोबतच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी, शिरसाट यांचे ते वैयक्तिक मत असावे, असे स्पष्ट केले आहे. असे असले तरी शिरसाट यांचे संकेत आणि त्यानंतर दरेकरांनी दिलेले स्पष्टीकरण यावरून 'मविआ 'मध्ये खूप काही शिजत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उद्या सकाळी ९.३० पासून येणार मतमोजणीचे कल
शनिवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल. ८.३० वाजता पहिले ईव्हीएम उघडले जाईल. त्याआधीच येणाऱ्या ब्रेकिंगवर विश्वास ठेवण्यात अर्थ नसेल. सकाळी ९.३० पासून मतमोजणीचे कल येण्यास सुरुवात होईल आणि दुपारपर्यंत राज्याचे चित्र समोर येईल, असे आयोगाच्या सूत्रांनी पुढारीला सांगितले. असे आयोगाच्याच सूत्रांनी सांगितले.
थोरात, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील सक्रिय
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या बंडखोर व अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधत असल्याची माहिती समोर आली आहे
'मविआ' नेत्यांची ठाकरे-पवारांशी चर्चा
विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी सत्तास्थापनेची रणनीती ठरविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी हॉटेल 'ग्रँड हयात' येथे बैठक झाली. यात स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर सत्तास्थापनेसाठी आघाडीचे निवडून येणारे बंडखोर आणि छोट्या पक्षांना आघाडीसोबत कसे घेता येईल, याबाबत खल केला. बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अनिल देसाई, संजय राऊत, सतेज पाटील हे 'मविआ'चे नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर काँग्रेस व शरद पवार गटाच्या नेत्यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नंतर शरद पवारांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आलेल्या 'एक्झिट पोल'मध्ये आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी शक्यता नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आघाडीने १३० पेक्षा जास्त जागा जिंकल्या, तर बहुमतासाठी उर्वरित आमदार कुठून आणता येतील, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. आघाडीचे सहा-सात बंडखोर निवडून येतील, असा अंदाज आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. त्यासोबत शेकाप, समाजवादी पक्ष आदी मित्रपक्षांच्या किती जागा येतील, यावर चर्चा झाली. प्रत्येक पक्षाने कोणाशी संपर्क करायचा, याची जबाबदारी वाटून घेतली आहे. जनतेचा स्पष्ट कौल कोणत्याच आघाडीला मिळाला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, यावरही बैठकीत चर्चा झाली.